आर्थिक परिस्थितीला कंटाळून मोहोळमध्ये पती-पत्नीची आत्महत्या

गुरूवार, 9 जानेवारी 2020 (11:58 IST)
मागील दोन वर्षांपासून रेफ्रिजरेटर दुरुस्ती दुकान व्यवस्थित चालत नसल्याने येत असलेल्या अपयशामुळे आर्थिक परिस्थितीला कंटाळून पतीपत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मोहोळ येथे घडली आहे.
 
श्रीशैल चंद्रकांत म्हेत्रे (वय 32) व पत्नी स्नेहा श्रीशैल म्हेत्रे (वय 25) अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. श्रीशैल म्हेत्रे हे मोहोळ येथील मधले मळा, गायकवाड वस्ती येथे राहत होते. पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई वडील, भाऊ, भावज यच्यासमवेत ते एकत्र राहत होते.

श्रीशैल यांचे स्वतःचे स्वामी समर्थ रेफ्रिजरेशन हे फ्रिज दुरूस्तीचे दुकान होते. ते स्वतःच त्यात काम करीत होते. पण व्यवसाय व्यवस्थित चालत नसल्यामुळे ते सतत नाराज असायचे. मंगळवारी ते दुपारी सद्‌गुरूच्या बैठकीस गेले होते, रात्री दहा वाजता घरी येऊन ते झोपले होते. बुधवारी सकाळी श्रीशैल यांच्या आई श्रीदेवी (वय 65) मुलगा व सून अजून कसे उठले नाहीत हे पाहण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. श्रीशैल व सून स्नेहा यांनी साडीच्या सहाय्याने पत्राशेडच्या लोखंडी पाइपला गळफास घेतल्याचे दिसून आले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती