धक्कादायक; खोणी गावात २१ लाखाची वीज चोरी

शनिवार, 14 ऑक्टोबर 2023 (20:25 IST)
कल्याण : गेल्या पाच महिन्यापूर्वी डोंबिवली जवळील खोणी गावात वीज चोरी तपासणीसाठी आलेल्या महावितरणच्या मलंगगड कार्यालयातील विशेष पथकावर ग्रामस्थांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात महावितरण कर्मचाऱ्यांसह पोलीस गंभीर जखमी झाले होते. महावितरणने या गावातील वीज चोरीचे मुल्यांकन करून १० ग्रामस्थांनी ७७ हजार युनिटसची वीज चोरी करून महावितरणचे २० लाख ८० हजार रूपयांचे नुकसान केले आहे, असा अहवाल तयार केला आहे. दरम्यान याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात वीज चोर ग्रामस्थांविरुध्द गु्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, खोणी गावात एका राजकीय पक्षाचा विशेष दबदबा आहे. त्यामुळे महावितरण कर्मचारी, पोलिसांना मारहाण होऊनही ग्रामस्थांवर गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून काही लोकप्रतिनिधींचा पोलिसांवर दबाव होते. खोणी गावातील काही ग्रामस्थांनी घरात महावितरणच्या मुख्य वीज वाहिनीवरून चोरून वीज पुरवठा घेतला आहे. अनेक महिने अशाप्रकारे वीज चोरी करून महावितरणचे आर्थिक नुकसान करणाऱ्या हनुमान ठोंबरे, अंकुश ठोंबरे, शिवाजी ठाकरे, सुमन ठोंबरे, काळुराम पाटील, सुरेश ठोंबरे, गणेश ठाकरे, मनीष ठाकरे या ग्रामस्थांविरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कार्यालयीन कामामुळे तक्रार दाखल करण्यास उशीर झाल्याचे कारण महावितरणकडून पोलिसांना देण्यात आले.
 
हल्ला प्रकरण
२४ मे रोजी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राजेश म्हसणे, पी. के. राठोड यांच्या आदेशावरून विशेष तपासणी पथक खोणी येथे वीज चोरी तपसाणीसाठी दुपारच्या वेळेत गेले. पथकाने श्रीधर ठोंबरे, रंजीत ठोंबरे, बयाबाई ठोंबरे यांच्या बंगल्यांतील वीज चोरी पकडली. पथकाने या बंगल्याचे वीज मीटर काढले.

रंजीता यांनी इतर ग्रामस्थांना एकत्र करून तपासणी पथक, त्यांची वाहने आणि पोलिसांवर हल्ला चढविला. कर्मचाऱ्यांकडून वीज मीटर हिसकावून घेऊन पळ काढला. तसेच जीवे मारण्याची धमकी कर्मचाऱ्यांना दिली होती. मारहाण प्रकरणी महावितरण कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ग्रामस्थांवर गु्न्हा दाखल केला होता. आता वीज चोरी करणाऱ्या ग्रामस्थांची यादी करून त्यांनी चोरलेल्या वीज चोरीचे मुल्यांकन करून वीज चोरी प्रकरणी कनिष्ठ अभियंता वैभव सावंत यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.




Edited By - Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती