सोनू सूदवर संजय राऊतांची टीका, भाजपकडून बचाव

रविवार, 7 जून 2020 (18:51 IST)
अभिनेता सोनू सूद लॉकडाउनच्या काळात परप्रांतीय मजुरांना आपल्या गावी जाण्यास मदत करत असून त्यांचे सर्वीकडे भरभरुन कौतुक होत असलं तरी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका त्याच्यावर केली होती. संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या रविवारच्या पुरवणीतील रोखठोक सदरात अभिनेता सोनू सूदवर सडकून टीका करत भाजपवर निशाणा साधला.
 
मात्र त्यांच्या या टीकेला भाजपचे नेते राम कदम यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी लिहिले की संजय राऊत यांचे लिखाण अत्यंत दुर्दैवी आहे. स्वतःही करायचं नाही @SonuSood सारखे लोक माणुसकीसाठी पुढे येऊन गोरगरिबांना मदत करत असतील त्यांचं कौतुक करायचं सोडून त्यांच्यावर @rautsanjay61 टीका ? हाच आहे का तुमचा माणुसकीचा धर्म ?
 
त्यांनी हे सुद्धा म्हटले की संपूर्ण महाराष्ट्रात हॉस्पिटल मध्ये जागा नाही ? म्हणून लोक घरी तडफडून मरता आहेत ? प्रत्येक घराघरात उपासमार सुरू आहे ?मात्र तुम्ही गरिबाला एका पैशाची अजून मदत केली नाही दुसरे करतात त्यांना तरी करू द्या.
 
खासदार संजय राऊत यांनी सोनू सूदवर टीका केली. भाजप त्याला चेहरा बनवू पाहत आहे, असा आरोपही केला. 
 
संजय राऊत आपल्या लेखात म्हणतात की सोनू सूद यांनी गेल्या काही दिवसांत हजारो मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवले. रेल्वे, बसेस, विमानाची तिकिटे त्यांनी काढली. प्रवासाची व्यवस्था केली. एक चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमांतून हे सर्व केले. ट्रस्टच्या माध्यमातून जमलेल्या पैशांतून मजुरांचा हा प्रवास खर्च उचलला असे सांगितले गेले. पण एखादी राजकीय, शासकीय, प्रशासकीय यंत्रणा पाठीशी असल्याशिवाय सोनू सूद हे सर्व करू शकेल काय?
 
राज्याराज्यांची सरकारे या स्थितीत हतबल झालेली आपण पाहिली. मजूर चालतच निघाले व लाखो मजूर बिहार, उत्तर प्रदेशच्या सीमेवर जाऊन रखडले. त्यांना तेथे घोटभर पाणीही मिळत नव्हते. सोनू सूद त्या भुकेल्यांच्या खवळलेल्या गर्दीत पोहोचले नाहीत. हे लाखो लोक तेथे पोहोचले ते काय फक्त सोनू सूदने खास व्यवस्था केलेल्या बस, रेल्वेने? ते आपले कुटुंबाचे ओझे वाहत चालतच निघाले. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था जशी महाराष्ट्र सरकारने केली तशी इतरत्र झाल्याचे दिसत नाही.
 
 केंद्र सरकारने तर या मजुरांना वाऱ्यावर सोडले. मजुरांना आपापल्या गावी जाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून महाराष्ट्र सरकारने एक खास कक्ष उभा केला, पण ‘‘कुणाला मुंबईतून उत्तर प्रदेशात जायचे असेल तर आपल्या मोबाईल नंबरसह एक मेसेज करा. सोनू सूद तुम्हाला घरी पोहोचवेल,’’ असा प्रचार ठरवून झाला. त्या प्रचारासाठी मोठी राजकीय यंत्रणा कामाला लावली गेली. सरकार मजुरांसाठी काही करत नाही, पण सोनू सूद करतोय हे बिंबवण्याचा प्रयत्न झाला.
 
सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करीत होते. सोनू सूद हा ‘महाबली’, ‘बाहुबली’ किंवा ‘सुपरहीरो’ आहे असे चित्र रंगवण्यात हे राजकीय पक्ष काही प्रमाणात यशस्वी झाले. भाजपमधील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले (हे दत्तक विधान गुप्त पद्धतीने झाले.) व त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला.
 
सोनू सूद हा एक अभिनेता आहे. पैसे घेऊन हवे ते संवाद फेकायचे व अभिनय करायचा हा त्याचा पेशा आहे. काही वर्षांपूर्वी ‘कोब्रा पोस्ट’च्या एका स्टिंग ऑपरेशनने सोनू सूदच्या अशाच व्यवहाराचा भांडाफोड केला आहे. सोशल माध्यमांवर इन्स्ट्राग्राम, ट्विटर अकाऊंटवरून छुप्या पद्धतीने भाजपच्या कार्याचा उदोउदो करण्याचे त्याने मान्य केले होते व त्यासाठी महिन्याला ‘दीड कोटी’ इतकी बिदागी त्याने मागितली होती.
 
भाजपचा नेता बनून सूदला भेटलेला ‘कोब्रा’चा प्रतिनिधी व सूदमधील व्यवहार्य संवाद धक्कादायक आहे. पैसे मिळाले तर कुणाचाही मुखवटा लावून वावरायचे व प्रचार करायचा हे सूदसारख्या अनेकांचे धंदे आहेत. त्यामुळे मजुरांचे दुःख वगैरे पाहून सूद महाशय भावनाविवश झाले, त्यांच्यातल्या माणुसकीची ज्योत फडफडू लागली, यावर कोणी शहाणा माणूस विश्वास ठेवायला तयार नाही.
 
सोनू सूद या महात्म्याचे नाव आता पंतप्रधान मोदींच्या एखाद्या ‘मन की बात’मध्ये येईल. मग ते दिल्लीत पंतप्रधानांच्या भेटीस निघतील व एक दिवस ते भाजपचे स्टार प्रचारक म्हणून मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये फिरताना दिसतील. तसा करार आधीच झाला असेल म्हणून सोनू सूद लॉकडाऊनचा मालामाल हीरो म्हणून तळपत राहिला. इतर सर्व हिरो लॉक डाऊन काळात घरीच बसले तेव्हा सोनू सूदचा अभिनय बहरून निघाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती