हनुमान चालिसाप्रकरणी राणा दाम्पत्याला धक्का

बुधवार, 20 डिसेंबर 2023 (08:37 IST)
अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी घराबाहेर हनुमान चालिसा पठण प्रकरणात कोर्टाने निर्णय दिला आहे. रवी राणा आणि नवनीत राणा यांची गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली. राणा दाम्पत्याला हा मोठा धक्का आहे.
 
मातोश्रीबाहेरील हनुमान चालीसा पठण आंदोलनप्रकरणी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी राणा दाम्पत्याने याचिका दाखल केली होती. ती याचिका कोर्टाने फेटाळली. खार पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा हे आरोपी आहेत. एफआयआर दाखल होण्यापूर्वीच केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा राणांचा दावा होता. कोर्टाने हा दावा फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आपला निकाल राखून ठेवला होता. तो निकाल आज जाहीर केला. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पुढील सुनावणीत कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
 
5 जानेवारीला आरोप निश्चिती
मुंबई सत्र न्यायालयात 5 जानेवारीला आरोप निश्चितीची प्रक्रिया होणार आहे. दोषमुक्ती याचिका फेटाळल्यानंतर कोर्टाकडून खटल्याच्या कारवाईला सुरुवात झाली आहे.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती