पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस भावनेचं राजकारण करत आहेत - प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप..

आज निवडणुकीच्या पद्धतीबाबतच जनतेच्या मनात शंका आहे. देशात बेरोजगारी वाढली. हातात असलेले रोजगार जात आहेत. देशात अस्वस्थता निर्माण झाली आहे. आरबीआयचे तीन गव्हर्नर सोडून का गेले हे आता स्पष्ट होत आहे. कोणतेही प्रश्न न सोडवता फक्त भावनेचे राजकारण पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस सरकार करत असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी माजलगाव येथील सभेत केला.
 
आपण सत्ताधारी पक्षात असाल तर त्यांना कोणत्या घोटाळ्याची चिंता करण्याची गरज नाही. त्यामुळे अनेकजण पक्षांतर करत आहेत, असेही पाटील म्हणाले.
 
शिवस्वराज्य यात्रेला कोणाचीही भीती नाही. भीती आहे ती भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेला.. म्हणूनच तर सभास्थानी डी सर्कलमध्ये सामान्यांना परवानगी नाही. शिवस्वराज्य यात्रेला इतका प्रचंड प्रतिसाद आहे की लोक डी सर्कलमध्ये येऊन बसतात. पण राष्ट्रवादीच्या मावळ्यांना कुणाचीही भीती नाही हे लक्षात ठेवा, असे आव्हान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला दिले.
 
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला जिथं तिथं विरोध होत आहे. महाजनादेश यात्रा जाईल तिथे विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना गायब केले जाते. महाजनादेश यात्रेला चिमुटभरही प्रतिसाद नाही, असा टोला मुंडे यांनी लगावला.
 
मुख्यमंत्र्यांना कदाचित माहिती नाही. मला भाजपचे सगळे खाचखळगे माहिती आहेत. भाजपकडे इतका पैसा कसा आला ? २०१३ला भाजपकडे टेलिफोन बिल भरण्याचे पैसे नव्हते. दीड कोटी रुपये नव्हते म्हणून मुंबई कार्यालयाचे काम बंद पडले होते. आता त्याच भाजपने दिल्लीत कार्यालयाची टोलेजंग इमारत उभी केली. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला किती धन लागलं आणि हे धन आलं कुठून हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या, असे आव्हानही मुंडे यांनी दिले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती