मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळात समन्वय नाही : फडणवीस

गुरूवार, 25 जून 2020 (10:40 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य मंत्रिमंडळात समन्वय नाही. मंत्र्या-मंत्र्यांमध्ये समन्वय नाही, मंत्री-प्रशासनात समन्वय नाही, प्रशासन-प्रशासनात समन्वय नसल्याचे राज्यात चाललेल्या कारभारावरून स्पष्ट होत आहे. कोरोनामुळे मुख्यमंत्र्यांनी आषाढी पूजेला यावे की नाही, हे त्यांनीच ठरवावे. लॉकडाऊनची आता गरज नाही. कोरोना उपचारासाठी महापौरांना 2 लाखांचे बिल, तर सामान्यांना किती त्रास होत असेल. 40 नव्हे तर आणखीन मृत्यू लपवल्याची शक्यता आहे. सोलापुरात ‘भगवान भरोसे’ कारभार नको, असे आपण जिल्हाधिकार्‍यांना सांगितल्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंंद्र फडणवीस म्हणाले.बुधवारी सोलापूर दौर्‍यावर आलेले फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, सोलापुरात वाढते कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय सिव्हिल रुग्णालयात पाहणी करून दोन रुग्णांशी व्हिसीद्वारे बोललो. जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्‍त यांच्याशी चर्चा केल्याचे सांगताना ते म्हणाले की, सोलापुरात रुग्ण संख्या तर वाढतच आहे, पण मृत्यूची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणे चिंताजनक आहे. सिव्हिलमध्ये डीन डॉ. ठाकूर यांनी प्रेझेंटेशन देत प्रयत्नांची माहिती दिली. सिव्हिल रुग्णालयाने प्लाझ्मा थेरपीसाठीचा प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले. तो मंजूर होण्यासाठी आपण प्रयत्न करू. सिव्हिलला कोरोनावरील रेमिडिसिव्हर औषध मिळावे, अशीही डीन यांनी विनंती केली आहे.
 
जिल्हाधिकारी व ‘मनपा’आयुक्‍तांशी चर्चा केली, पण कोरोना नियंत्रणासाठी सुधारणांची गरज आहे. ट्रेसिंग आणि टेस्टिंग कमी झाल्यामुळे रुग्ण व मृत्यू संख्या वाढत आहे. आयसोलेशन व क्‍वारंटाईन वाढवणे गरजेचे आहे. सोलापुरात विडी कामगार खूप आहेत. कोमआर्बिडी असून तिथे जास्त लक्ष दिले तरच मृत्यूदर कमी होणार आहे. शासकीय दवाखान्यात बेड नसल्यास खासगी दवाखान्यांत जावे लागते. खासगी दवाखाने बेड नसल्याचे सांगतात. तिथे प्रशासनाचा एक कर्मचारी बसवला पाहिजे. महापौरांना कोरोना उपचारासाठी खासगी दवाखान्यात 2 लाख बिल भरावे लागते, मग मध्यमवर्गीयांना किती मोठा त्रास असेल. खासगी दवाखान्यांत होणार्‍या बिलाची तपासणी व चौकशी झाली पाहिजे. ‘महात्मा फुले’योजनेत केवळ गंभीर रुग्णांवर उपचार होतात. कोविड रुग्णाला बिल भरावे लागते आहे. मृतदेह ताब्यात द्यायला उशीर होतो. 40 मृत्यू लपविल्यासंदर्भात महापालिका आयुक्‍तांनी दिलेले कारण न पटण्यासारखे असून आणखीन मृत्यू लपवले असण्याची शक्यता आहे. मृत्यू लपवून ही लढाई जिंकता येणार नाही. सोलापूरचा कारभार ‘भगवान भरोसे’चालणार नाही, असे आपण जिल्हाधिकारी यांना सांगितले आहे. नगरपालिकांना एक रुपयाचाही निधी शासनाने दिलेला नाही. तीन महिन्यांचे कर्मचार्‍यांचे वेतन थांबले आहे. अक्‍कलकोटसह सर्वच नगरपालिकांना निधी देण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांना दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
 
मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासह मंत्र्यांमध्ये आणि प्रशासनामध्येदेखील समन्वय नसल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले, प्रशासनातही गट पडले असून नेत्यांनी समन्वय राखला पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही. लॉकडाऊनची आता गरज नाही. कारण सामान्य जनता आर्थिक अडचणीत सापडत आहे. गरज असलेल्या कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन करावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती