‘इंडिया’च्या बैठकीसाठी मुंबई सज्ज

बुधवार, 30 ऑगस्ट 2023 (07:28 IST)
भाजपाला सक्षम पर्याय देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आघाडीची, ‘इंडिया’ची तिसरी बैठक गुरुवारी मुंबईत सुरू होत असून दोन दिवसांच्या या बैठकीसाठी ५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह देशभरातील विरोधी पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आघाडीचे निमंत्रक व समन्वय समिती नियुक्त करणे, आघाडीचा झेंडा, लोगो व अजेंडा निश्चित करणे, जागावाटचे सूत्र ठरवणे याबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे आगामी निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी असणार आहे.
 
विरोधी आघाडीची पहिली बैठक पाटण्यात, तर दुसरी बैठक बंगळुरू येथे झाली होती. आता तिसरी बैठक मुंबईत होत असून, या बैठकीसाठी २६ पक्षांचे सुमारे १०० नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी, मलिकार्जुन खरगे यांच्याबरोबरच ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, एमके स्टॅलिन, नितीश कुमार, हेमंत सोरेन असे पाच राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आजच मुंबईत दाखल झाले.
 
आघाडी म्हणून अनेक पक्ष एकत्र आले तरी ते निवडणूक आपापल्या पक्षाच्या चिन्हावर लढणार आहेत. त्यामुळे एकसंघपणा वाटावा, यासाठी आघाडीचा झेंडा व ‘लोगो’ तयार करण्याची व प्रत्येक पक्षाने आपल्या निवडणूक चिन्हाबरोबर प्रचारात त्याचा वापर करावा, अशी कल्पना पुढे आली आहे. त्याबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती