दिवाळीत फटाके फोडा, पण ‘कोविड’ विषयक आवश्यक ती खबरदारी कटाक्षाने घ्यायची आहे

मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 (09:21 IST)
पुणे व ठाणे या दोन शहरांमध्येच पर्यावरणस्नेही फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आली असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्यातही सरकारनं सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास मज्जाव करत फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. 
 
दरम्यान, पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता आणि दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने दिवाळी सणात सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच, दिवाळी पहाटचे कार्यक्रम घेण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. असा आदेश पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी काढला आहे.
 
तर, मुंबई महापालिकेनं फटाके बंदीचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं दिवाळीसंदर्भात नवी नियमावली जाहीर केली आहे. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी मोठे फटाके फोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच फटाके फोडण्यास महापालिकेनं परवानगी दिली आहे. १४ नोव्हेंबर २०२० रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी केवळ सोसायटीचे अंगण/घराचे अंगण इत्यादी खासगी परिसरांमध्येच सौम्य स्वरुपाचे फटाके जसे की, फुलबाजी (फुलझडी), अनार (कोठी/ झाड) यासारखेच फटाके फोडण्यास मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात येत आहे. मात्र, हे करताना नागरिकांनी ‘कोविड’ विषयक आवश्यक ती खबरदारी कटाक्षाने घ्यायची आहे, असे सांगण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती