मनोहर जोशी यांचं निधन, हृदयविकाराच्या झटक्यानंतर उपचादाराम्यान घेतला अखेरचा श्वास

शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024 (08:56 IST)
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे.   आज (23 फेब्रुवारी) पहाटे 3 वाजून 2 मिनिटांनी मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
 
दोनच दिवसांपूर्वी म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी मनोहर जोशींना अस्वस्थ वाटू लागल्यानं हिंदुजा रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
 
मात्र, या उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 
 
मनोहर जोशी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा पश्चिमेला रुपारेल कॉलेजजवळील W54 या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेवण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल.
 
दादर स्मशान भूमीत मनोहर जोशींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील.
 
राजकारणातला सुसंस्कृत चेहरा हरवला - गडकरी
मनोहर जोशींच्या निधनाची वार्ता कळल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावरून आदरांजली अर्पण केलीय.
 
गडकरींनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला. अतिशय नम्र, हजरजबाबी आणि महाराष्ट्र तसेच मराठी माणूस यांच्याविषयी मनापासून तळमळ असलेला नेता आपण गमावला आहे."
 
गडकरी पुढे म्हणाले, "युती सरकारच्या काळात जोशी सरांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळाली. कुटुंब प्रमुखाप्रमाणेच कायम त्यांचे मार्गदर्शन लाभले. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो."
 
अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक'
संजय राऊत यांनी लिहिलंय, "शून्यातून विश्व निर्माण करणारे, कडवट महाराष्ट्र अभिमानी, अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगलेल्या मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन!"
बाळासाहेब ठाकरेंचे निकटवर्तीय
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची पक्षात ओळख होती. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात त्यांना 'जोशी सर' म्हटलं जाई.
 
मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मुद्द्यावर आक्रमक होताना, त्यांनी भाषेच स्तर आणि संयमीपणा कधीच सोडला नाही, असं त्यांच्याबद्दल त्यांचे समकालीन सांगतात.
 
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबईत जवळपास 50 उड्डाणपूल मनोहर जोशींच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात बांधले गेले.
 
औद्योगिक विकासाकरता त्यांनी 'अॅडव्हान्टेज महाराष्ट्र' परिषद भरवली होती. 1994 साली जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचीही त्यांनी स्थापना केली.
 
कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळावं, या उद्देशून अॅग्रो अॅडव्हान्टेज महाराष्ट्र परिषद भरवली.
 
मनोहर जोशी यांनी जवळपास 15 पुस्तके लिहिली आहेत.
 
मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावात झाला.
 
मुंबईतील किर्ती कॉलेजमध्ये त्यांनी बी.ए.ची पदवी पूर्ण केली. त्यानंतर मुंबई महापालिकेत क्लार्कची नोकरी केली.
 
मनोहर जोशी यांना उद्योजक होण्याची इच्छा असल्यामुळे दूध, फटाके, हस्तीदंतीच्या वस्तूंच्या विक्रीचे अनेक व्यवसाय त्यांनी करुन पाहिले.
 
2 डिसेंबर 1961 ला नोकरी सोडून कोहिनूर क्लासेसला सुरुवात केली. आज कोहिनूर ग्रुप शिक्षणाबरोबरच हॉटेल, हॉस्पिटल, बांधकाम क्षेत्रात कार्य करत आहे.
 
1967 साली शिवसेनेत प्रवेश केला.
 
दोनदा नगरसेवक, तीनदा विधानपरिषद सदस्य, 1976-77 मध्ये मुंबईचे महापौर, दोनदा विधानसभा सदस्य, 1990-91 मध्ये विरोधी पक्षनेते पद अशी पदं त्यांनी सांभाळली.
 
1995 मध्ये शिवसेना भाजपाच्य युतीचं सरकार सत्तेत आलं तेव्हा मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले होते.
 
त्यानंतर 1999-2002 दरम्यान अवजड व सार्वजनिक उद्योग खात्याचे केंद्रीय मंत्री, 2002-2004 दरम्यान लोकसभेचे अध्यक्ष आणि 2006-2012 राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली.
 
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती