जागा वाटपाच्या बाबतीत महाविकास आघाडीचे दिरंगाईचे धोरण

शनिवार, 9 मार्च 2024 (09:21 IST)
मविआच्या नेत्यांकडून आमचा योग्य तो सन्मान ठेवला जात नसल्याची तक्रार वंचितकडून वारंवार केली जात आहे. अशातच आज वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांना एक पत्र लिहीत जागावाटपाबाबत आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. तसंच मविआच्या आतापर्यंतच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली आहे.
 
वंचित आघाडीने मविआतील तीन प्रमुख पक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "आम्ही जागा वाटपाच्या बाबतीत महाविकास आघाडीचे दिरंगाईचे धोरण आणि अनिर्णायक दृष्टिकोनाबद्दल चिंतित आहोत. २ फेब्रुवारी आणि २७ फेब्रुवारीच्या बैठकांनंतरच्या महाविकास आघाडीच्या अंतर्गत चर्चेत आम्हाला वगळले गेले, महाविकास आघाडीची ही संथपणाची आणि आम्हाला टाळण्याची भूमिका असली तरीही महाविकास आघाडीबद्दल आम्ही सकारात्मक आहोत. २०१८ साली झालेल्या पक्ष स्थापनेपासून, वंचित बहुजन आघाडीचा पाया दलित, आदिवासी, बहुजन, भटके विमुक्त, गरीब मराठा आणि मुस्लीम समूहांमध्ये वेगाने विस्तारत असताना महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला केवळ २ जागा देऊ केल्या आहेत," असा आरोप वंचित आघाडीने केला आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती