राज्य सरकारच्या विरोधात पोस्ट करणाऱ्या तरुणाला अटक

सोमवार, 26 ऑक्टोबर 2020 (09:52 IST)
ट्वविटरवर राज्य सरकारच्या विरोधात पोस्ट करणाऱ्या समीत ठक्कर या तरुणाला नागपूर पोलिसांनी राजकोट मधून अटक केली आहे. समीत ठक्कर विरोधात नागपूरच्या सीताबर्डी आणि मुंबई च्या विलेपार्ले पोलीस स्टेशन मध्ये आयटी ऍक्ट अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. नागपूर पोलिसांनी राजकोटमध्ये ठक्करला अटक केली आणि ट्रानझिस्ट रिमांडवर त्याला नागपूरला आणले आहे. 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी करत असल्याचा आरोप समित ठक्कर या तरुणावर करण्यात आला. युवासेनेचे पदाधिकारी धर्मेंद्र मिश्रा यांनी समित ठक्कर विरोधात तक्रार केली होती. आरोपी समित हा भाजपचा आयटी सेलचा कार्यकर्ता आहे, असा दावा तक्रारदारांनी केला आहे. 
 
धर्मेंद्र मिश्रा यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर १ ऑक्टोबर २०२० रोजी हायकोर्टाने समित याला पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले. त्यानंतर समित ५ ऑक्टोबर रोजी वी. पी. पोलीस स्टेशन येथे तपास अधिकाऱ्यांसमोर दाखल झाला. मात्र, काही वेळातच तो बाथरुमला जातो असं सांगून पळून गेला.
 
दरम्यानच्या काळात सायबर पोलिसांनी समित याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. कोर्टाने सुरुवातीला समित ठक्कर याला त्याचा लॅपटॉप, मोबाईल पोलिसांसमोर सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याने कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं नाही. ही बाब कोर्टाच्या लक्षात आणून दिल्यावर कोर्टाने पुन्हा आरोपी समित याला वी. पी. रोड पोलीस स्टेशन आणि सायबर क्राईम पोलीस स्टेशन येथे जाऊन तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आदेश दिले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती