अवघ्या ८ वर्षाच्या किमयाची ‘किमया’, लिहिले गोष्टींचे पुस्तक

गुरूवार, 25 मार्च 2021 (07:32 IST)
‘माय ओन लिटल वर्ल्ड’ चे नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन
 
ही तर देशाची वंडर गर्ल : गडकरी
नाशिक : प्रत्येक लहान मुलामध्ये कुठली तरी कला दडलेली असते. कधी ती चित्रकला, संगीत, नृत्य आदीच्या माध्यमातून प्रगट होते. मात्र नाशिकच्या अवघ्या आठ वर्षाच्या किमयाने अगदी आपल्या नावाप्रमाणे किमया करत थेट गोष्टी लिहील्या आहेत. तिच्या याच गोष्टींच्या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाइन कार्यक्रमात संपन्न झाले.
 
 
यावेळी बोलताना गडकरी यांनी किमयाचा उल्लेख ‘वंडर गर्ल’ असा करत ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे की इतक्या लहान वयात कल्पनाशक्तीच्या जोरावर किमयाने गोष्टी लिहिल्या आहेत. या गोष्टी फक्त लिहिल्या नसून त्यामध्ये एक सकारात्मक आणि संस्कार यांचा सुंदर मिलाफ दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. आताची तिची प्रगती बघता तिचं भविष्य नक्कीच उज्ज्वल असून ती नक्की मोठी लेखिका बनेल असे त्यांनी सांगितले. 
 
माशेलकर यांनी सांगितले की, लहान वयात मोठी समज असण हा खूप मोठा गुण आहे. मी पुस्तक वाचलं असून यात मनोरंजन नसून प्रत्येक कथेत एक संदेश दिला आहे. तर रूपाणी यांनी यापुढे किमयाने लिहिलेले पुस्तक प्रकाशित करायला आवडेल असे सांगत तिला प्रोत्साहित केले.  
 
सामान्यपणे लहान मुलांना गोष्टी ऐकायला खूप आवडतात. अनेकदा रोज रात्री गोष्टी ऐकत झोपायचं असाच त्यांचा नित्यक्रम असतो. नाशिकच्या किमयाने मात्र एक पाऊल पुढे टाकत थेट गोष्टी लिहिल्या आहेत. तिच्या याच गोष्टीच्या पुस्तकाचे नाव ‘माय ओन लिटल वर्ल्ड’ (my own little world) असे असून यात अकरा वेगवेगळ्या विषयांवरच्या कथांचे संकलन केले आहे. किमया इस्पालिअर हेरिटेज स्कुलची विद्यार्थिनी आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून आपल्या भावना विचार चित्रकला आणि लिखाणाच्या माध्यामातून व्यक्त करण्याचा प्रयत्न किमया करत आहे. यातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. सोबतच या निमित्ताने किमया महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची इंग्रजी लेखिका ठरत असून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही याची नोंद करून घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 
किमयाच्या या पुस्तकाविषयी अधिक माहिती देतांना तिची आई आर्किटेक्ट आणि आर्टिस्ट शीतल सोनवणे-उगले सांगतात की, किमया साधारपणे तीन वर्षाची असेल तेव्हा तिने पहिले चित्र काढले. त्यावेळी तिने एका मुलीचं चित्र काढलं. त्यानंतर तिने चित्रे काढायला सुरुवात केली. पुढे कॅनव्हासवर चित्रे काढल्यानंतर तिने चित्रांखाली लिहिण्याचा प्रयत्न केला. तिथून हा प्रवास सुरु झाला. पुस्तकात लिहिलेल्या कथा या तिच्या कल्पनाशक्तीवर आधारीत आहे. तिने लिहिलेल्या एका कथेमध्ये दोन भाज्यांच भांडण होत. मात्र हे भांडण योग्य नाही हे त्यांना कसं समजत याचं अतिशय रंजक चित्रण यात आहे. तर नृत्य करतांना बुटाचा रंग मुळीच महत्वाचा नाही तर नृत्य शिकण गरजेच आहे ही गोष्ट चिमुकलीला समजते यावर कथा आहे.  
 
प्रतिक्रीया
किमयाचा या कलेमागचं गुपित सांगतांना शीतल सोनवणे-उगले सांगतात की, मुळात कुठलीही कला शिकवता येत नाही तर ती प्रत्येकामध्ये असतेच. मात्र तिचा आपापल्या पद्धतीने शोध घेऊन विकास करायचा असतो या मताची मी आहे. त्यामुळे किमयाला काय आवडत हे आम्ही तिला तिचं ठरवू दिल. त्यावर कुठल्याही प्रकारे बंधने आणली नाहीत. त्यामुळेच मला असं वाटत की ती काही तरी वेगळ करू शकते.
 
मुळात लाजाळू असलेली किमया या पुस्तकावर अगदी मोजक बोलताना सांगते की, मला लहानपणापासून चित्र काढायला खूप आवडत. मी आईकडून चित्र काढायला शिकले. आई चित्र काढल्यानंतर चित्राविषयीची माहिती लिहिते. ते बघूनच मला चित्रांसोबतच लिहायलाही आवडू लागलं. मला बोलण्यातून व्यक्त होण्यापेक्षा चित्रातून संवाद साधायला आवडतो. मात्र मी ठरवून मुळीच लिहीत नाही. मला सुचलं तर मी लिहिते. भविष्यात मला सुचलं तर नक्की गोष्टी लिहिणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती