जळगाव थंडी गायब झाली असून उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात

मंगळवार, 20 फेब्रुवारी 2024 (09:24 IST)
फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात अनेक भागांमधून थंडी गायब झाली असून उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्यातील अनेक शहरांचा तापमानाचा पारा ३५ अंशापर्यंत पोहोचला आहे. जळगावाचा पाराही रविवारी ३६ अंशापर्यंत पोहोचला आहे. मार्च महिन्याला सुरुवात झालेली नाही त्योवर जळगाव तापू लागलं आहे. आगामी काही दिवस जिल्ह्यातील वातावरणात अचानक बदल होऊन, तापमानात वाढ किंवा घट, ढगाळ वातावरण असे बदल होण्याचा अंदाज आहे.
 
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानात चढ-उतार दिसून आला आहे. या महिन्याच्या सुरुवातीचे काही दिवस वगळता तापमान वाढताना दिसून आले. तर गेले काही दिवस रात्रीच्या तापमानात घट दिसून आल्याने रात्री गार आणि दिवसा उन्हाच्या झळा बसत आहे. यंदा नोव्हेंबर ते जानेवारी या तीन हिवाळी महिन्यांमध्ये थंडी गायबच राहिली. त्यामुळे हिवाळ्यातील सरासरी तापमानात १ ते २ अंशाची वाढ झाली. आता फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पारा ३६ अंशावर पोहोचला आहे. त्यामुळे आगामी चार महिने तापमानाचे कसे जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून जागतिक हवामान बदलामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. त्यातच या वर्षभरात तीच परिस्थिती जळगाव जिल्ह्यात दिसून आली. यंदा उन्हाळ्याचे आगमन लवकर होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात दोन ते तीन उष्णतेच्या लाटादेखील निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पारा ४० अंशाच्या पुढे जाण्याचीही शक्यता आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती