ख्रिसमस साजरा करण्यासाठी सरकारकडून निर्देश जारी

बुधवार, 23 डिसेंबर 2020 (16:21 IST)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ख्रिसमससाठी  गृह मंत्री अनिल देशमुख यांनी काही निर्देश जारी केले आहेत. यानुसार ख्रिसमसनिमित्त कुठल्याही चर्चमध्ये 50 हून अधिक लोकांना एकत्रित येण्याची परवानगी नसेल. यासंदर्भात, सर्व ख्रिस्ती बांधवांनी यावर्षी ख्रिसमसचा उत्सव अगदी साधेपणाने साजरा करावा, असे आवाहनही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही शहरांमध्ये नाईट कर्फ्यूदेखील लागू करण्यात आला आहे. 5 जानेवारीपर्यंत हा नाईट कर्फ्यू लागू राहणार आहे.
 
चर्च प्रशासनाला करावे लागेल सोशल डिस्टन्सिंगचे पालन -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृहमंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशानुसार, चर्च प्रशासनाला सोशल डिस्टन्सिंग आणि चर्चमध्ये गर्दी होणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल. यावर्षी स्थानिक चर्चमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या सार्वजनिक प्रार्थनेसाठी केवळ 50 जणांनाच एकत्रित येण्याची परवानगी देण्यात आली आहे. याच बरोबर चर्च प्रशासनाला परिसराचे नियमितपणे सॅनिटायझेशनदेखील करावे लागेल. याशिवाय चर्चमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला मास्कचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. 
 
60 वर्षांवरील नागरिक अन् 10 वर्षांखाली मुलांनी घराबाहेर पडणे टाळावे -
ग्रुहमंत्रलयाने जारी केलेल्या निर्देशांत, 60 वर्षांवरील नागरिक आणि 10 वर्षांखाली मुलांनी चर्चमध्ये जाणे अथवा घराबाहेर पडणे टाळावे. यावेळी त्यांनी घरातच सण साजरा करावा. याच बरोबर, गर्दी होईल, असे देखावे अथवा आतिषबाजी करू नये. तसेच 31 डिसेंबरला आभारप्रदर्शनासाठीचे मास आयोजित करताना वेळेचे निर्बंध पाळवेत आणि मध्यरात्रीऐवजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारासच याचे आयोजन करावे, असे म्हणण्यात आले आहे. याशिवाय चर्चमध्ये प्रभू येशूचे स्तुतीगीत गाण्यासाठी 10हून अधिक व्यक्तींचा सहभाग नसावा. तसेच यावेळी माईक स्वच्छ असण्यासंदर्भातही काळजी घ्यावी, असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती