इर्शाळवाडी : 'ज्या डोंगरांच्या सावलीत वाढलो, तेच आता कोसळू लागले आहेत'

रविवार, 23 जुलै 2023 (17:49 IST)
इर्शाळगडाला इर्शाळगड म्हणतात, हे लहानपणी बराच काळ माहिती नव्हतं. आम्ही त्याला सिंहाचा डोंगर, लायन्स केप असं काही काही म्हणत असू. कारण आम्हाला तो तसाच दिसायचा.
 
आजोळी नागावहून कर्जतला येताना दांड मार्गे येणारी गाडी मुंबई-पुणे हायवेवर यायची, तेव्हा एसटीच्या खिडकीतून इर्शाळगड दिसू लागायचा. हा डोंगर दिसला, म्हणजे आता आपलं गाव जवळ आलं, याची खात्री पटायची.
 
आता दरड आणि चिखलानं इर्शाळवाडी तर नष्ट केली आहेच पण या डोंगराच्या छाताडावर जणू एक मोठी जखम केली आहे. हिरव्यागार डोंगरावर मातीचा मोठा ओरखडा.
 
ओरखडा कसला? कातडं सोलून निघावं आणि आतली आतडी बाहेर यावी तसा दिसतो इर्शाळ. हे सगळंच छिन्न, भीतीदायक, हृदयद्रावक आहे.
 
सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी तयार झालेल्या हिमालयापेक्षा कितीतरी जुन्या डेक्कन ट्रॅप्सचा भाग असलेली ही रांग. हे प्राचीन पर्वत आमचे सोबती.
 
पण ज्या डोंगरांच्या सावलीत वाढलो, ज्यांनी कायम एक प्रकारचा आधार दिला, तेच आता कोसळू लागले आहेत.
 
या डोंगरांमधल्या वाड्याही आजकाल नाही, तर शतकांपासून तिथे वसलेल्या. आणि पिढ्यानपिढ्या तिथे राहात आलेली ही माणसं आजही तशी साधी-भोळी, निसर्गावर प्रेम करणारी, निसर्गासोबत राहणारी.
 
इर्शाळवाडीच्या आठवणी
डोंगरांमध्ये नेहमी भटकंती करणारे गिर्यारोहक आणि ट्रेकर्स इर्शाळवाडीच्या घटनेनंतर या वाडीतल्या आठवणी जागवतायत.
 
एव्हरेस्ट सर करणारे गिर्यारोहक संतोष दगडे सरावासाठी अनेकदा हा किल्ला चढून जायचे.
 
ते सांगतात की वाडीतले प्रत्येक घर म्हणजे ट्रेकर्स मंडळींचे हक्काचे घर. चहा, गरम गरम चटणी भाकर, फणसाचे गरे असे भरपूर काही हक्काने मिळायचे.
 
“एव्हरेस्टला जाण्याआधी सरावा करिता इथे जायचो. तेव्हा वाटेत गावातली लहान-मोठी भेटली की राम राम ठोकायचो. ते पण अदबीने चौकशी करायचे."
 
संतोष पुढे सांगतात, “दरड कोसळल्यावर पहाटे साडेपाच वाजता मी व हेमंत जाधव मदतीचे काही साहित्य घेऊन वर गेलो. होत्याचं नव्हतं झालं होतं.
 
"मोजकी घरे सोडली तर पूर्ण गाव जमिनी खाली गाडले गेलेले हेत. डोळ्यावर विश्वास बसत नव्हता, ओळखीची घरे शोधण्याचा प्रयत्न सुरू झाले सर्वत्र निराशा पदरी पडत होती.
 
“गाई,गुरे दावणीला बांधलेल्या अवस्थेतच आपल्या प्राणाला मुकले होते ,कुत्रे रिकाम्या घराच्या पायरीवर बसून आपल्या मालकांचा नावाने रडताना दिसत होते. पुन्हा एकदा निसर्गाने आपले रूद्र रूप दाखवले होते आणि त्याच्या पुढे मानव पुन्हा एकदा हतबल झालेला दिसत होता.”

कर्जतच्या सोनिया गरवारे यांनी दोनदा हा गड सर केला आहे. त्या लिहितात की, “तिथल्या प्रेमाने गरमागरम जेवू घालणाऱ्या, ‘ताई, थोडावेळ पडा इथंच, ऊन उतरलं की उतरा खाली असं म्हणणाऱ्या बायका, तिथली कोंबड्यांच्या मागे धावणारी लहान लहान मुलं, ‘पोरींनो, मी शिडी घट्ट धरली आहे, चढा तुम्ही बिनधास्त, मी आहे इथं उभा’, असं म्हणणारे ते आजोबा, हे सगळे चेहेरे डोळ्यासमोर येत आहेत.”
 
दरड कोसळली, त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सोनिया इतर ट्रेकर्ससोबत गडावर मदतीसाठी गेल्या होत्या.
 
त्या सांगतात “चढत असतानाच २-३ वेळा गडगडण्याचा आवाज आला. वर गेल्यावर कळले की तो आवाज पुन्हा एकदा दरड कोसळण्याचाच होता. वर पोहोचलो, तर कुठे गेली होती इर्शाळवाडी? समोर होता तो फक्त २५-३० फूट मातीचा ढिगारा.”
 
“पावसाने चिंब भिजलेली, थंडीने कुडकुडणारी दोन वाचलेली माणसे तिथे रडत उभी होती. अनेकांचे नातेवाईक आशेने उभे होते.
 
"मदतकार्यासाठी आलेल्यांपैकी कोणी मातीचा ढीग उकरत होतं, कोणी लाकडं-विटा-कौलं बाजूला करत होतं, कोणी अडकलेल्या प्राण्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत होतं. पण मनोमन सगळ्यांना कळून चुकलं होतं की परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. सगळे हतबल झाले होते.”
 
ही जबाबदारी कोणाची?
इर्शाळगड दरडप्रवण क्षेत्र नव्हतं, असं प्रशासन म्हणतंय. पण ते केवळ कागदोपत्री ‘दरडप्रवण’ नव्हतं. कारण तिथं नियमित जाणारे लोक हा डोंगर अवघड आहे आणि तिथले दगड कोसळू शकतील असेच होते, असं सांगत आले आहेत.
 
अर्थात इर्शाळगडावर याआधी एवढी मोठी दरड कोसळली नव्हती, हे खरं आहेच.
 
पण आसपासच्या परिसरात दरड कोसळण्याच्या घटना गेल्या दहा-पंधरा वर्षांत वाढल्या आहेत. अती तीव्र पावसामुळे किंवा विकासकामांमुळे- कारणं काहीही असोत.
 
मला आठवतंय, 2005 साली ढाकच्या डोंगरात दरड कोसळली होती. त्या पावसात माथेरानमध्ये ऐतिहासिक रेल्वे मार्ग बंद करावा लागला होता आणि कर्जत शहरातल्या टेकड्‌यांवरही भूस्खलन झालं होतं.
 
अगदी गेल्या दोन वर्षांतही इथल्या टेकड्‌यांचे तुरळक भाग निखळण्याच्या घटना घडल्या आहेत. रायगडच्या खालापूर आणि कर्जत तालुक्यात पाच-सहा गावं दरडग्रस्त म्हणून आधीच घोषित झाली होती.
 
या बहुतांश जागा इर्शाळगडापासून 15-20 किलोमीटरच्या आत आहेत. माथेरानचा डोंगर तर अगदी शेजारी आहे.
 
मग या भागात आधीच पाहणी झाली होती का? आधीच काही उपाययोजना करता येतात का? असे प्रश्न विचारले जात आहेत. अनेक प्रश्नांची उत्तरं सरकारला आणि प्रशासनाला द्यावी लागणार आहेत.
 
पण तीन दिवसांत नऊशे मिलीमीटर पाऊस पडला, याची जबाबदारी कोण घेणार? हवामान बदल हे वास्तव आहे. पण लाईफस्टाईल आणि विकासाच्या चुकीच्या कल्पनांमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास त्यात भर घालतो आहे, हे दुसरं वास्तव आपण कधी स्वीकारणार आहोत? राजकीय नेत्यांवर यासाठी कितीजण दबाव टाकतात?
 
निसर्गसंपन्न जागा दिसली की लगेच रिसॉर्ट टाकायचा नि सेकंडहोम बांधायचा विचार कितीजण करतात? अशा जागांच्या रक्षणासाठी आणि ते रक्षण करणाऱ्यांसाठी खरंच कितीजण काम करतात?
 
किती प्रश्न डोक्यात येतायत दोन दिवस. वेळ निघून जात आहे, कदाचित वेळ निघून गेली आहे.
 



Published by- priya dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती