राज्यात महापूर मात्र मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत मग्न...

बुधवार, 7 ऑगस्ट 2019 (09:08 IST)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवस्वराज्य यात्रेला सुरवात केली. अहमदनगर जिल्ह्यत सभा पारनेर इथे पार पडली. यावेळी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते आणि आमदार अजित पवार यांनी राज्यकर्त्यांना आस्था नाही म्हणून पारनेरला पाणी मिळाले नाही. यांना निर्णय करायाचा असता तर आत्तापर्यत निर्णय केला असता पण या सरकारची क्षमता नाही, अशी टिक्स सरकारवर केली आहे.
 
राज्यात महापुराची परिस्थिती असताना मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत मग्न आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीत पवारसाहेब तातडीने धावून जायचे. हे सरकार जनतेशी समरसच झाले नसल्याचे सुद्धा पवारांनी यावेळी सांगितले. राज्यातील पतसंस्था अडचणीत आणण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोप सुद्धा आ. पवार यांनी केला. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने शरद पवार यांचा सांगावा घेऊन मी आलो आहे. गाफील राहु नका रात्र वैऱ्याची असल्याचं  अजित पवार यांनी पारनेरच्या सभेत मतदारांना सांगितले.
 
शिवस्वराज्य यात्रेत प्रत्येक दिवशी भाजपाच्या मेगाभरती लाभार्थ्यांची पोलखोल करणार असे आश्वासन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी दिले होते. त्याप्रमाणे मुंडे यांनी मधुकर पिचड यांना आदरणीय पवार साहेबांनी खूप काही दिले तरी त्यांनी पक्षांतर केले, अशी टीका त्यांनी केली. पिचड यांनी पक्षप्रवेश केला कारण त्यांच्या पत्नीविरोधात फसवणुकीचे प्रकरण आहे. पिचड यांच्या पत्नी ज्या बिगर आदिवासी आहेत. त्यांनी खोटे आदिवासी सर्टिफिकेट दाखवून आदिवासी शेतकऱ्यांची जमीन लाटली आणि समृद्धी महामार्गाच्या नावावर सरकारकडून १४ कोटी ५० लाख रुपयांचा मोबदला घेतला. त्यामुळे पिचड यांनी भाजपत प्रवेश केल्याचा आरोप मुंडे यांनी केला. 
 
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले गेले. आंदोलन केले गेले. त्यावरुन लक्षात येते की, जनतेचा आदेश काय आहे ते? मुख्यमंत्री जिथे जाईल तिथे सांगतात मी मुख्यमंत्री होणार...मी पुन्हा येणार...महाराष्ट्र कुणाची जहागीरी नाही. राज्यातील जनता त्यांचा मुख्यमंत्री निवडण्यास सक्षम आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत चित्र वेगळे असेल हे निश्चित...असा विश्वास खा. कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती