पक्षांतर्गत राजकारणाचा त्रास असह्य झाल्यामुळे मी हा निर्णय घेतला -वसंत मोरे

बुधवार, 13 मार्च 2024 (09:11 IST)
पक्षांतर्गत राजकारणाचा त्रास असह्य झाल्यामुळे मी हा निर्णय घेतल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं. मोरे यांच्या राजीनाम्यानंतर मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक खोचक पोस्ट शेअर केली असून नाव न घेता त्यांनी वसंत मोरे यांना टोला दिला. अविनाश जाधव यांनी या पोस्टच्या माध्यमातून तिरकसपणे वसंत मोरे यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा.
 
अविनाश जाधव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "एक राजा रोज हत्तीवरून राज्यात फेरफटका मारायचा. तेव्हा प्रत्येक चौकात राजाचं औक्षण केलं जायचं,आरती ओवाळली जायची,धुमधड्याक्यात स्वागत केलं जायचं. तेव्हा त्या हत्तीला वाटायचं औक्षण-आरती, आपलीच केली जात आहे. त्याला कळत नव्हतं ही राजाची पुण्याई आहे. राजामुळे त्याला हा मान मिळत आहे." अविनाश जाधव यांनी या पोस्टच्या माध्यमातून तिरकसपणे वसंत मोरे यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
 
राजीनामा देताना काय म्हणाले वसंत मोरे?
मनसे नेते वसंत मोरे यांनी अखेर पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वसंत मोरे हे नाराज होते. "मला तिकीट मिळू नये यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. यापुढे मी काय करायचे हे पुणेकर ठरवतील. जर लोकसभा लढवायची ठरवली तर मी एकटा लढणार, माझ्या घरातील मी पहिला राजकारणी, कुणाच्या कुबड्या घेऊन पुढे आलो नाही. राजसाहेबांच्या हृदयात मी स्थान निर्माण केले, पण ते डळमळीत करण्याचं काम पुणे कोअर कमिटी करतेय," असा आरोप वसंत मोरे यांनी राजीनामा देताना केला आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती