उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र : मराठवाड्यातील तापमान वाढणार

बुधवार, 3 एप्रिल 2024 (11:49 IST)
अवकाळीचं सावट अधूनमधून डोकावत असतानाच राज्यात उकाडा प्रचंड वाढताना दिसत आहे. राज्याच्या काही भागांमध्ये तापमानाचा आकडा हवामान बदलांमुळे कमी-जास्त होताना दिसत असून, सध्या कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्र सूर्याच्या तीव्रतेनं होरपळून निघताना दिसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.
 
सध्याच्या घडीला विदर्भ, कर्नाटकसह तामिळनाडूच्या दक्षिण भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ज्यामुळे दिवसाप्रमाणेच रात्रीच्या वेळीसुद्धा उन्हाच्या झळांची उष्णता जाणवत आहे. दुपारच्या वेळी तापमानात होणारी लक्षणीय वाढ रात्रीपर्यंत कायम रहात असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. याच धर्तीवर धाराशिव, नांदेड, लातूर आणि सोलापुरात उष्ण रात्रीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
 
उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार
हवामान तज्ज्ञ आणि अभ्यासकांच्या अंदाजानुसार यंदाच्या वर्षी कोकण किनारपट्टी वगळता राज्यभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार असून उष्णतेच्या झळा वाढण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या सुरू असणारा एप्रिल आणि ऐन उन्हाळ्यातला मे महिना अधिक उष्ण राहणार असून, यादरम्यान उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतेक भागात उष्णतेच्या लाटा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यातील उष्णतेच्या लाटेचा काळ दोन दिवसांपासून आठ दिवसांपर्यंत असू शकतो. त्यामुळे दैनंदिन कामं आणि सध्या सुरू असणारी निवडणुकांची रणधुमाळी पाहता या काळात विशेष काळजी घेण्याच्या सूचना हवामान विभागाने केल्या आहेत.
 
मराठवाड्यातील तापमान वाढणार
नुकताच भारतीय हवामान विभागाच्या महासंचालकांनी एप्रिल ते जून या तीन महिन्यांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला. या अहवालामध्ये देशभरात मार्च महिना अल निनोमुळे सरासरीपेक्षा उष्ण ठरल्याची बाब समोर आली. एप्रिल आणि मे महिन्यांतही तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज असल्याचा इशारा यावेळी हवामान विभागाने देत येत्या काळात मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तापमान सरासरीपेक्षा किमान दोन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यताही वर्तवली.

Edited By- Ratnadeep ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती