गोव्याने आपला चौकीदार गमावला - शिवसेना

मंगळवार, 19 मार्च 2019 (19:40 IST)
शिवसेनेन भाजपा नेते मनोहर पर्रिकर यांना सामनातून आदरांजली वाहिली आहे. दैनिक सामने ने त्यांना गोव्याचा चोकिदार असे संबोधले असून एक चांगला आणि उत्तम माणूस राजकारणी गेला असे म्हटले आहे. वाचा सामनातून काय मत व्यक्त केलय.
 
मुख्यमंत्री म्हणून पर्रीकरांनी गोव्याचा चेहरा बदलला. गोवा हे पर्यटकांसाठी अमली पदार्थांचे स्वर्गद्वार होते. त्यांनी ही ओळख पुसून टाकली. गोव्यात रस्ते, वीज, उद्योग यावर काम केले. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री म्हणून नाही, तर ‘भाई’ म्हणून गोयंकरांत परिचित होते. भाऊसाहेब बांदोडकरांनंतर सर्वसामान्य गोवेकरांना आपला वाटेल असा सामान्य माणूस मुख्यमंत्री झाला तो म्हणजे मनोहर पर्रीकर. तिरंग्यात लपेटलेल्या त्यांच्या मृतदेहास हिंदुस्थानी सैन्याने खांदा दिला. अखेरची मानवंदना दिली, तेव्हा गोव्याने आपला चौकीदार गमावला व देशातून सचोटीचे प्रयाण झाले.
 
देशाच्या राजकारणातून ‘साध्या’, ‘सरळ’, पण तितक्याच कर्तव्यकठोर माणसाने कायमचा निरोप घेतला आहे. मनोहर पर्रीकर यांचे जाणे म्हणजे राजकारणातील सत्य-सचोटीचा दिवा विझण्यासारखे आहे. सध्या ‘चौकीदार’ या शब्दावर जोर दिला जात आहे, पण गोव्याच्या चौकीदाराची जबाबदारी पर्रीकरांनी चोख बजावली होती. पर्रीकर हे गोव्यासारख्या लहान राज्याचे मुख्यमंत्री होते. देशाचे संरक्षण मंत्रीपद त्यांनी काही काळ भूषवले, पण त्यांच्या निधनाने संपूर्ण देशावर जणू दुःख आणि शोक याचा सर्जिकल स्ट्राइक झाला. पर्रीकरांचे कमालीचे साधेपण व रक्ताच्या थेंबा थेंबातली सचोटी लोकांनी अनुभवली. त्यांनी हे सर्व न बोलता केले. साधेपणाचा बडेजाव मिरवला नाही. पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री तीन वेळा झाले. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचा हिंदू जनमानसावर असलेला प्रभाव आणि गोव्यातील ख्रिश्चनांचे प्राबल्य पाहता गोव्यात कधी भाजपचा मुख्यमंत्री होईल ही अशक्यप्राय गोष्ट होती, पण आयआयटीयन तरुण पर्रीकर हे पुन्हा गोव्यात परतले व त्यांनी संघ कार्यास वाहून घेतले. 1991 मध्ये त्यांनी उत्तर गोवा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. त्या वेळी काँग्रेस उमेदवाराकडून पर्रीकर पराभूत झाले, पण पर्रीकरांना मिळालेली मते गोव्याच्या नव्या राजकीय घडामोडींची नांदी ठरली. 1994 मध्ये पर्रीकर पणजी मतदारसंघातून गोवा विधानसभेत पोहोचले होते. भाजपचे चार सदस्य तेव्हा निवडून गेले, पण पर्रीकरांनी विरोधी बाकांवरून आणि गोव्याच्या रस्त्यांवर तत्कालीन काँगेस सरकारला नामोहरम केले. लढवय्या नेता म्हणून ते गोव्यातील जनतेच्या गळय़ातील ताईत बनले. पुढच्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपच्या 21 आमदारांना विजयी करून विधानसभेत पोहोचले व मुख्यमंत्री झाले. अस्थिर गोव्याला त्यांनी स्थिर व कार्यक्षम सरकार दिले. आयाराम-गयारामांची दुकाने बंद केली. पंतप्रधान मोदी यांनी गाजवलेला ‘न खाऊंगा न खाने दूंगा’चा यशस्वी प्रयोग पर्रीकरांनी सर्वप्रथम गोव्यात केला.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती