आणि बापाने लहान मुलींला विष पाजले

स्वतःच्या  किशोरवयीन मुलांना बळजबरीने पित्यानेच  विष पाजण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक व धक्कादायक प्रकार रविवारी दि.२१ रोजी  शिंदे गावात उघड झाला आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित पित्याविरूध्द जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
 
शहरात काही दिवसांपुर्वीच चिमुकलीला आईने गळ्यावर ब्लेडने वार करून ठार मारल्याची घटना घडली होती. असाच काहीसा प्रकार पुन्हा शिंदे गावात घडला आहे, पित्याने आपल्या शाळकरी मुलीच्या तोंडात किटकनाशके टाकून ठार मारण्याचा केलेला प्रयत्नही उघड झाला आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित बाप  पंढरीनाथ बाबुराव बोराडे ४८,रा. शिंदेगाव याने आपल्या लहान मुलामुलींना बळजबरीने विषारी किटकनाशके पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला, ही घटना शनिवारी रात्री घडली व ती रविवारी सकाळी उघड झाली. या प्रकरणात मुलीने शैक्षणिक साहित्याच्या मागणी साठी काही पैश्यांची मागणी केल्यामुळे संतापलेल्या मद्यपी बापाने या मुलीला बळजबरीने किटकनाशके पाजण्याचा प्रयत्न केला असे पोलिसांनी केलेल्या तपासात स्पष्ट झाले आहे. हा प्रकार जेव्हा घडला तेव्हा घरात मुलांची आई नव्हती.
 
याप्रकरणी पित्याविरूध्द मुलाने नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या बहिणीने शाळेचा गणवेश, पाठ्यपुस्तके आदि शैक्षणिक साहित्यांची मागणी वडिलांकडे केली. त्याचा राग येऊन बाप पंढरीनाथ याने तिला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली नंतर जनावरांच्या गोठ्यात असलेल्या रोगर किटकनाशकाची भरलेली बाटली आणून मुलीच्या तोंडात बळजबरीने ओतण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत भावाने म्हटले आहे. या मुलीवर सध्या उपचार सुरु आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती