फडणवीस मोदी यांच्यापेक्षा मोठे नेते असावेत, संजय राऊत यांचा टोला

गुरूवार, 25 मार्च 2021 (15:53 IST)
परमबीर सिंग यांनी खरंच ते पत्र लिहिले आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यांना कोणीतरी लिहून दिले आणि त्यांनी ते दिले, असे शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी म्हटले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशीसंदर्भात प्रतिक्रिया देताना ही त्यांनी शंका व्यक्त केली. त्याचवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मोठे नेते असावेत, असा टोला राऊत यांनी यावेळी लगावला. अनिल देशमुख यांच्या चौकशीसंदर्भात निवृत्त न्यायाधीशांची चौकशी नेमली तर राजीनाम्याची गरज नसते, असे संजय राऊत म्हणाले. 
 
अनिल देशमुख हे पहिल्या दिवसापासून चौकशी करा, असे सांगत आहेत. चौकशीला कोणाचाही नकार नव्हता. मुख्यमंत्री, अनिल देशमुख, आम्ही चौकशी करा म्हणत होतो, फक्त विरोधी पक्षनेते म्हणतात चौकशी नको आधी फाशी द्या, अशी टीका त्यांनी केली.  वारंवार राजीनाम्याची आणि सरकार बरखास्त करण्याची मागणी यामुळे विरोधी पक्षाचं हसे झाले आहे. लोक त्यांना मूर्खात काढतात हे समजले पाहिजे. आमच्यासाठी हा विषय संपला असून यावर आता जास्त चर्चा होता कामा नये. यामध्ये विशेष घडामोडी घडतील असं वाटत नाही, असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती