शेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे सरकारचे अपयश - धनंजय मुंडे

मंगळवार, 22 जानेवारी 2019 (09:39 IST)
साता-यातील खंडाळा गावातून अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांना रविवारी मुंबईत अडवण्यात आले आहे. पोलिसांनी मोर्चेकऱ्या़ंना मानखुर्द येथे अडवून धरले. भूसंपादनासह विविध मागण्यांसाठी १२ जानेवारीपासून हे आंदोलक मुंबईच्या दिशेने पायी चालत येत होते. शेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे सरकारचे अपयश आहे, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना अडचणीत आणत आहे. जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे, असे म्हणतानाच महाराष्ट्रात शेतकऱ्यांची अशी अवस्था कधीच नव्हती, असेही त्यांनी नमूद केले. राष्ट्रमाता जिजाऊंचे नाव समृद्धी महामार्गाला देण्यात यावे या मागणीचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज पुनरुच्चार केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ही आधीपासूनची मागणी आहे. आमची मागणी खोडसाळ आहे असे काही लोकांना वाटत असेल तर त्यांनी आधी त्यांची निष्ठा तपासावी, असा टोलाही त्यांनी लगावला. 
'' 
'या' प्रकरणाची रॉ किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून चौकशी करा 
 
गेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक करण्यात आल्याची माहिती असल्यानंच भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा दावा एका सायबर तज्ज्ञानं केला आहे. या प्रकरणाची चौकशी रॉ किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली. 
 
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं ईव्हीएम हॅक करुन विजय मिळवल्याचा दावा अमेरिकन सायबर तज्ज्ञानं केला. या संपूर्ण प्रकरणाची कल्पना असल्यानंच गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा दावाही त्यानं केला. याबद्दल धनंजय मुंडेंनी आश्चर्य व्यक्त केलं. 'गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांनी नेहमीच त्यांच्या मृत्यूबद्दल प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू हा अपघात होता की अपघात, याची चौकशी व्हायला हवी,' अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली. या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे. 'गोपीनाथराव मुंडे यांची हत्या झाल्याचा दावा एका सायबर तज्ज्ञानं केला आहे. या दाव्याची रॉ किंवा सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी झाली पाहिजे. कारण ही माहिती एका लोकनेत्याशी संबंधित आहे,' असं मुंडेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती