तुकोबांच्या पादुकांचे आषाढी वारीसाठी आज प्रस्थान, वाचा कसा असेल यंदाचा पालखी सोहळा

गुरूवार, 1 जुलै 2021 (13:20 IST)
देहू येथील संत तुकाराम महाराज पादुकांचे आषाढी वारीसाठी आज (गुरुवार, 1 जुलै) प्रस्थान होणार आहे. दुपारी दोनच्या सुमारास पालखी पंढरपूरला जाण्यासाठी औपचारिक प्रस्थान ठेवतील. यंदाचं हे पालखी सोहळ्याचं 336वं वर्ष आहे.
 
हा सोहळा औपचारिक पद्धतीने पार पाडला जाणार आहे. प्रस्थान झाल्यानंतरही तुकाराम महाराजांच्या पादुका 1 ते 18 जुलैदरम्यान देहू येथील मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यातच राहतील. त्यानंतर 19 जुलै रोजी एसटीने या पादुका पंढरपूरकडे रवाना होणार आहेत.
 
त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका 2 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान करतील.
 
यादरम्यान पंरपरेनुसार पालखी मार्गावर होणारे कार्यक्रम हे देऊळवाड्यातच होतील. त्यासाठी विशेष प्रवचनकार, कीर्तनकार, पालखीचे मानकरी, सेवेकरी, टाळकरी, मचलेकर दिंडीवाले यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. या कालावधीत देहूतील मुख्य मंदिरात फक्त मोजक्या लोकांनाच प्रवेश मिळणार आहे.
 
या कालावधीत तुकाराम महाराज मंदिर आणि परिसराचं दर तीन तासांनी निर्जुंतुकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
 
परवानगी असलेल्या पालख्यांनाच पंढरपुरात प्रवेश
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकरी संप्रदायाची परंपरा कायम ठेवून नियोजन केलं आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी फक्त प्रशासनाने परवानगी दिलेल्या पालख्याच पंढरपुरात बसने दाखल होतील.
 
त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही पालखी, दिंडी किंवा वारकरी मंडळांनी या कालावधीत पंढरपुरात येऊ नये, असं आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केलं.
 
आषाढी वारी नियोजनाकरिता पंढरपूर येथे बुधवारी (30 जून) एक बैठक पार पडली. त्यामध्ये सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पालखी नियोजनासंदर्भात सूचना करण्यात आल्या.
 
आषाढी वारीसाठी सरकारने मान्यता दिलेल्या पालख्या आणि पालख्यांसोबत वारकरी पालखीतळावर आल्यानंतर तिथून पंढरपूरकडे येईपर्यंत, एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत काय काळजी घ्यायची यासंदर्भातील सूचना प्रांताधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. या काळात बाहेरुन आलेल्या वारकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येईल.
 
तत्पूर्वी, पंढरपुरातील रस्ते दुरुस्ती करण्यात येणार आहेत. वारकरी ज्या ज्या ठिकाणी थांबणार तो मठ आणि परिसराचं निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.
 
त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी थांबतील त्या ठिकाणचा सर्व परिसर, इमारतींचंही निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती