कोरोना: 'आईच्या अंत्यसंस्काराची तयारी केली आणि कळलं की ती जिवंत आहे'

रविवार, 11 एप्रिल 2021 (13:40 IST)
-प्रवीण मुधोळकर
आपल्या आईच्या मृत्यूची बातमी ऐकून अजय मून यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. आईला निरोप देण्याचीही त्यांनी तयारी सुरू केली. मृतदेह समोर आल्यावर ते भावनाविवश झाले आणि आपल्या आईचे अंत्यदर्शन घेण्याची ईच्छा त्यांनी बोलून दाखवली.
 
जेव्हा कर्मचाऱ्यांनी पार्थिवाचा चेहरा दाखवला तेव्हा ती आपली आई नाहीये हे त्यांना कळलं. या सर्व काळात मून कुटुंबीयांना कोणत्या परिस्थितीतून जावे लागले असेल याची कल्पना न केलेलीच बरी.
 
नागपुरातील 'कोविडालय' या खासगी केव्हिड केअर सेंटरनं उपचार सुरू असलेल्या रुग्णाच्या मृत्यूची नोंद केली आणि नातेवाईकांना दुसराच मृतदेह सोपवला.
 
नातेवाईकांनी मृतदेहाचा चेहरा पाहण्याची विनंती केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यानच्या काळात नातेवाईकांनी अंत्यसंस्काराचीही तयारी केली होती.
 
10 एप्रिल रोजी हा प्रकार नागपूरच्या जामठ्यातील 'गायकवाड-पाटील कोविडालय' इथं घडला. या हॉस्पिटलविरोधात हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
 
हिंगणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सरिन दुर्गे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, "अजय मून यांनी शनिवारी (10 एप्रिल) दुपारी दोन वाजता आमच्याकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्यांनी त्यांची आई आशा मून (वय वर्षे 63) यांना कोरोनाची बाधा झाल्याने जामठा येथील कोविडालय या हॉस्पिटलमध्ये काल दाखल केल्याचे सांगितले. पण आज त्यांना हॉस्पिटलमधून सकाळी फोन आला आणि त्यांच्या आईचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने मृतदेह घेण्यासाठी येण्यास सांगण्यात आले. हॉस्पिटलमध्ये आल्यावर त्यांना त्यांच्या आई आशा मून यांचा मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्रही देण्यात आले."
 
"हॉस्पिटलमध्ये मृतदेह ताब्यात घेतल्यावर मृतदेहाचा चेहरा पाहिल्यावर त्यांना हा मृतदेह त्यांच्या आईचा नसल्याचं कळलं. यावर त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाला माहिती विचारल्यावर कर्मचाऱ्यांच्या चुकीने हा प्रकार झाल्याचं त्यांना सांगण्यात आले," असं दुर्गेंनी बीबीसी मराठीला सांगितलं.
 
या प्रकरणात हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी काय चूक केली आणि हा प्रकार कसा घडला, याची चौकशी हिंगणा पोलिसांनी सुरू केली आहे. या प्रकरणात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी बोलून कोणता गुन्हा दाखल करता येईल हे सुद्धा पडताळून पाहत असल्याचं दुर्गेंनी सांगितलं.
 
आशा मून यांचे पुत्र अजय मून यांच्याशीही बीबीसी मराठीनं बातचीत केली.
 
"आम्हाला जेव्हा हॉस्पिटलमधून फोन आला आणि आईचा मृत्यू झाल्याचं सांगितलं, तेव्हा आमच्यावर दुख:चा डोंगर कोसळला. मी घरच्यांना तातडीनं कळवलं. नंतर आम्ही सगळेजण कोविडालय हॉस्पिटलकडे निघालो," असं अजय सांगतात.
 
ते पुढे म्हणतात, "आमच्या घरच्यांनी आईच्या अंत्यसंस्काराची तयारी करून ठेवली होती. माझा एक मित्र घाटावर जाऊन आईच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्याची माहिती देऊन आला होता."
 
मात्र, मृतदेहाचा चेहरा पाहिल्यानंतर अजय मून यांच्या लक्षात आलं की, हा मृतदेह आपल्या आईचा नाहीय. त्यानंतर त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाकडे तक्रार केली. तेव्हा लक्षात आलं की हे सर्व चुकीनं घडलंय. त्यांच्या आईवर उपचार सुरू होते आणि त्यांचा मृत्यू झाला नव्हता.
 
"सुदैवाने माझी आई आता सुखरूप आहे आणि तिला आम्ही घरी आणले आहे. आता आईवर कोरोनाचे उपचार करण्यासाठी आम्ही हॉस्पिटल शोधतोय. जे हॉस्पिटल मिळेल तिथे आईला दाखल करू. माझ्या आईची तब्येत सध्या तरी बरी आहे," असं अजय मून यांनी सांगितलं.
 
नेमकं झालं काय?
63 वर्षीय आशा मून या नागपुरातील काशीनगर येथे राहतात. शुक्रवारी कोरोना चाचणी केल्यानंतर त्या पॉजिटिव्ह असल्याचं लक्षात आलं.
 
कुटुंबात इतरांना कोरोना होऊ नये म्हणून त्यांना डोंगरगाव येथील पूर्वीचे गायकवाड-पाटील कॉलेज, तर आताचे कोविडालय या हॅास्पिटलमध्ये शुक्रवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास भरती करण्यात आलं होतं. भरती केल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांना घरी पाठवलं.
 
शनिवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास कोविडालयातून फोन आला. आशा मून यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. ही माहिती कळताच सर्व नातेवाईक कोविडायलयात पोहचले. तेथील कर्मचाऱ्यांनी आशा मून यांच्या नावाचे मृत्यूचे प्रमाणपत्र दिले. प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये असलेला मृतदेह घेऊन जाण्यास नातेवाईकांना सांगण्यात आले.
 
नातेवाईकांनी मृतदेहाचा चेहरा दाखवण्याची अट घातली. बॅगमध्ये असलेला मृतदेह आपला नसल्याचे दिसताच नातेवाईकांनी मून यांना जिथे ठेवले होते तिथे धाव घेतली. पण आशा मून आपल्या रुग्णालयातील बेडवर बसून होत्या.
 
नातेवाईकांनी याच जाब विचारल्यावर हॉस्पिटलमधील बाऊन्सरने सर्व नातेवाईकांना बाहेर काढले.
 
मून कुटुंबीयांना सुपुर्द करण्यात आलेला मृतदेह हा जलाबाई रामटेके या महिलेचा असून त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला, असं कोविडालय रुग्णालयाच्या प्रशासनाने रामटेके कुटुंबीयांना सांगितलं आहे.
 
या संदर्भात गायकवाड-पाटील ग्रुपच्या कोविडालय या हॉस्पिटलचे संचालक मोहन गायकवाड यांच्याशी बीबीसी मराठीनं संपर्क साधला.
 
मोहन गायकवाड म्हणतात, "आमच्या 300 बेड्सच्या डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल असणाऱ्या कोविडालयमध्ये शनिवारी पहाटे जलाबाई रामटेके या महिलेचा मृत्यू झाला. त्यावेळी कामावर असणाऱ्या नर्सने आपली ड्युटी आटोपून जलाबाई यांचे केस पेपर असणारी फाईल आणि त्यांच्या शेजारच्या बेडवर असणाऱ्या आशा मून यांच्या केस पेपरची फाईल तयार केली. मृत्यू झालेल्या जलाबाई यांची फाईल आणि पूर्णपणे बऱ्या असलेल्या आशा मून यांची फाईल दोन्ही फाईल सोबत घेऊन ही नर्स रिसेप्शन एरियात आली. यावेळी जलाबाई यांच्या फाईलऐवजी आशा मून यांची फाईल देऊन नर्सने हॉसिपटल प्रशासनाला डेथ सर्टिफिकेट तयार करायला सांगितले."
 
"नर्स ड्युटी आटोपून घरी गेल्यावर सकाळी हॉस्पिटल प्रशासनाने आशा मून यांचे डेथ सर्टिफिकेट तयार करून हॉस्पिटलच्या रिसेप्शनिस्ट कडे दिले. रिसेप्शनिस्टने आशा मून यांच्या मुलाला फोन करून माहिती दिली की आशा मून यांचा मृत्यू झालाय. हॉस्पिटलमध्ये आल्यावर नातेवाईकांना कळले की हे डेथ सर्टिफिकेटवर जरी आशा मून लिहले असले तरी जलाबाई रामटेके यांचे ते आहे. आम्ही तात्काळ ते डेथ सर्टिफिकेट रद्द केले आणि मून कुटुंबियांची माफी मागितली. पण मून यांच्या कुटुंबीयांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये बोलावले. त्यांनी आशा मून यांना आमच्या हॉस्पिटलमधून हलवले. आम्ही मून यांच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या उपचाराचा एक रुपयाही घेतला नाही," असंही मोहन गायकवाड यांनी पुढे सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती