छगन भुजबळांच्या अडचणी वाढणार? 'त्या' प्रकरणात ४ याचिकांवर स्वतंत्र सुनावणी होणार

मंगळवार, 2 एप्रिल 2024 (09:38 IST)
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात राज्याचे अन्नपुरवठा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मात्र आज झालेल्या सुनावणीत या प्रकरणी चार वेगवेगळ्या याचिकांवर स्वतंत्र सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, सर्वोच्च न्यायालयात अंजली दमानिया यांनी महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी दाखल केलेली याचिका निकाली निघाली आहे. अशातच अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ यांना निर्दोष करार देणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयातील अनेक न्यायाधीशांनी not before me केल्यामुळे सुनावणी होत नव्हती.
 
मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होत नाही म्हणून अंजली दमानिया यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार आता हे प्रकरण आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मोडक यांच्यासमोर सुनावणीसाठी पार पडली.
 
या सुनावणीत न्यायाधीश मोडक यांनी संपूर्ण प्रकरण जाणून घेतल्यानंतर चार वेगवेगळ्या याचिकांवर स्वतंत्र होणार सुनावणी होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 एप्रिल आणि 29 एप्रिल ला स्वतंत्र होणार आहे.
 
काय आहे महाराष्ट्र सदन घोटाळा?
छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना जारी करण्यात आलेल्या विविध कंत्राटामधून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना रोख रक्कम लाचेच्या स्वरुपात मिळाल्याचा आरोप होता. महाराष्ट्र सदन व इंडिया बुल्स प्रकरणात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वतंत्र गुन्हे दाखल केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने भुजबळांविरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायदान्वये दोन गुन्हे दाखल केले होते.

Edited by -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती