बंडखोरांसाठी केंद्र सरकार सरसावले; घराच्या सुरक्षेसाठी CRPF जवान तैनात

सोमवार, 27 जून 2022 (09:37 IST)
एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर शिवसेना पंधरा आमदारांना थेट केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. काल शिंदे गटातील १५ आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव आणि राज्यपाल यांना पत्र लिहिल्यानंतर आज ही सुरक्षा पुरवण्यात आली आहे. ही सुरक्षा पुरवल्यानंतर शिवसेनेचे खा. अरविंद सावंत यांनी केंद्रावर टीका केली आहे. राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर मुद्दाम अविश्वास दाखवला जात असल्याचे सांगून या कारस्थानामागे भाजप असल्याचे स्पष्ट झाल्याचेही म्हटले आहे.

शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर सुरुवातीला शिवसैनिकांनी संयम पाळला. पण, गेल्या दोन दिवसात शिवसेना आक्रमक झाल्यानंतर बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याच्या काही घटना घडल्या. त्यानंतर त्यांच्या घरावरही मोर्चे काढले जात आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी पोस्टर फाडले जात आहे. या संपूर्ण घटनेनंतर बंडखोर आमदारांनी सुरक्षेबाबत राज्याकडे बोट केले. त्याचबरोबर त्यांनी केंद्राकडे सुरक्षा पुरवण्याची मागणी केली. त्यानंतर १५ बंडखोर आमदारांना तूर्त दिलासा मिळाला असून इतर आमदारांनाही ही सुरक्षा पुरवली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती