देशमुखांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला : फडणवीस

मंगळवार, 23 मार्च 2021 (16:16 IST)
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप खोडून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत परमबीर यांच्या आरोपात तथ्य नाही. अनिल देशमुख १५ ते २७ फेब्रुवारी या दरम्यान होम क्वारंटाईन होते, असं शरद पवार म्हणाले होते. हे दावे खोडून काढण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेत कागदपत्र सादर केली. यात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख हे खासगी विमानाने १५ फेब्रुवारीला मुंबईत आले होते, असा दावा केला आहे. देशमुखांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
 
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत काही कागदपत्रे सादर केली. यात त्यांनी पोलीसांची दैनंदिन माहितीपत्र सादर केलं. यात कोणते मंत्री कधी आणि कुठे जाणार आहेत, याची माहिती त्यात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी १७ फेब्रुवारी २०२१ ची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यात १७ फेब्रुवारी २०२१ ला ३ वाजता अनिल देशमुख सह्याद्रीवर येतील आणि जातील अशी माहिती देण्यात आली आहे. तसंच २४ फेब्रुवारीची देखील माहिती दिली आहे. अनिल देशमुख ११ वाजता मोटारीने निवास स्थान ते मंत्रालय आणि मंत्रालय ते निवासस्थान असे जातील, अशी माहिती देण्यात आली आहे. पण गृहमंत्री गेले की नाही माहित नाही, असं फडणवीस म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती