अटल ग्रामीण आरोग्य शिबिर शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य सुविधा पोहचविणार- मुख्यमंत्री

सोमवार, 3 डिसेंबर 2018 (08:57 IST)
अटल आरोग्य शिबीराच्या माध्यमातून सरकार आदिवासी आणि  दुर्गम भागातील शेवटच्या गरजू व्यक्तिपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातील नांदुरी येथे आयोजित अटल ग्रामीण आरोग्य शिबिराच्या उद्घाटनात ते बोलत होते.
 
या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीष महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ. राहुल आहेर,बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, जे.पी.गावीत, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, विभागीय आयुक्त राजाराम माने, विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, पोलिस अधिक्षक संजय दराडे, डॉ. रागीणी पारेख, डॉ.अजय चंदनवाले, डॉ. एम. डी. तावडे, कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर आादी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात विविध प्रकारचे संशोधन होत आहे. अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. मात्र त्यांचा खर्च अधिक असल्याने सामान्य माणूस रोगाचे निदान झाले तरी उपचारापासून दूर राहतो. बऱ्याचदा यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो. आता सरकारने ही जबाबदारी स्वीकारुन गरजू रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार मोफत देण्याचा निश्चिय केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजनेच्या रुपाने सुरु केली. या योजनेतंर्गत देशातील 50 कोटी जनतेला 5 लाखापर्यंतचे उपचार करण्याची सुविधा प्राप्त झाली आहे. राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गतदेखील गरीब रुग्णांना मोफत उपचार देण्यात येतात. दोन्ही योजनांमध्ये उपचार शक्य नसल्यास  मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून उपचार करण्यात येत आहे. कुठलीही उपचार पद्धती आणि सर्व प्रकारच्या उपचाराची सुविधा सरकारने दिली आहे, असे त्यांनी सांगितले.
 
पालकमंत्र्यांचे अभिनंदन
 
अटल आरोग्य शिबीराच्या माध्यमातून राज्यात आरोग्यसेवेची नवी संस्कृती पालकमंत्री महाजन यांच्या प्रयत्नाने रुजली असल्याचे सांगून त्यांनी पालकमंत्र्यांचे अभिनंदन केले. तर आदिवासी बांधवाना वनजमीन पट्टे देण्याचे काम वेगाने सुरु असल्याचे सांगून जिल्ह्याने चांगली कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांचे अभिनंदन केले.
 
पालकमंत्री म्हणाले, दुर्गम भागातील आदिवासी बांधवापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीरासाठी उद्योग, संस्था आणि सेवाभावी संस्था यांचे सहकार्य लाभले आहे. शिबीराच्या माध्यमातून साडेतीन लाख लोकांपर्यंत डॉक्टर्स पोहोचले आहेत. गरजु रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया व मोफत औषधोपचाराची सुविधा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 डॉ. लहाने म्हणाले, मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील हे 27 वे  मोठे शिबीर असून आतापर्यंत 27 लाख रुग्णांना त्याचा लाभ झाला आहे. 2 लाख 67 हजार रुग्णांची शस्त्रक्रिया, 20 हजार ह्रदय शस्त्रक्रिया व 12 हजार बायपास सर्जरी शिबीराच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत 750 कोटी रुपयांचा निधी आरोग्य सेवेसाठी देण्यात आला आहे.
 
प्रास्ताविकात डॉ. आहेर यांनी शिबीर आयोजनाची माहिती दिली. सोबतच शिबिराच्या आयोजनाबद्दल मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना धन्यवाद दिले. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते जनजाती गौरव यात्रेचा शुभारंभ आणि लघुपटाचे उदघाटन करण्यात आले.
 
चौकट-
 
·        रुग्णांच्या वाहतूक, भोजन आणि पिण्याच्या पाण्याची  व्यवस्था
 
·        विविध रोगांसाठी 100 तपासणी कक्ष
 
·        1700 डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी
 
·        मोफत औषध आणि उपकरणांचे वाटप
 
·        पाच दंतवैद्यक वाहनातून दंतरोगाचे उपचार
 
·        सर्व पॅथीच्या उपचारांसोबत योगचिकीत्से विषयी मार्गदर्शन
 
·        स्वत: पालकमंत्री यांनी प्रत्येक कक्षाला भेट देवून रूग्णांशी संवाद साधला

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती