मुंबई महापालिकेच्या नव्या आयुक्तांची नियुक्ती, पाहा कोण आहेत नवीन आयुक्त

शुक्रवार, 22 मार्च 2024 (09:08 IST)
एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील मुंबई तसेच उपनगरांत मोठे प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ठाणे महापालिकेचे आयुक्तपद सौरभ राव यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. यासह कैलाश शिंदे यांच्यावर नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाची जबबादारी देण्यात आली आहे.
 
केंद्रीय निवडणूक आयोगाने काल कठोर निर्णय घेत ज्या अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे त्यांना हटवण्याचे आदेश दिले होते. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने मंगळवारी आयोगाकडे आयुक्तपदासाठी तीन नावांचे पर्याय पाठवले होते. सरकारने पाठवलेल्या तीन नावांपैकी केंद्रीय निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.
 
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे व पी. वेलारसू यांची बदली करावी आणि त्यांच्या जागी नवीन नियुक्ती मंगळवारी सायंकाळपर्यंत करावी, असे आदेश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने आयुक्तपदासाठी गगराणी, डिग्गीकर व मुखर्जी यांची नावे सुचविलेली होती. त्यावर आयोगाने आज निर्णय घेत भूषण गगराणी यांची आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.
 
 भूषण गगराणी कोण आहेत?
इक्बाल चहल यांची बदली झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी भूषण गगराणी हे प्रबळ दावेदार मानले जात होते. डॉ. संजय मुखर्जी तसेच अनिल डिग्गीकर यांचीही नावे चर्चेत होती. मात्र शेवटी गगराणी यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1990 सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्याकडे मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार होता.

Edited By -Ratnadeep Ranshoor  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती