अजित पवारांवर कारवाई करावी लागेल : शरद पवार

शनिवार, 23 नोव्हेंबर 2019 (13:39 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की अजित पवारांवर कारवाई करावी लागेल. मात्र, तो निर्णय कुणी एक व्यक्ती घेणार नाही, बैठकीत यावर निर्णय घेण्यात येईल.  
 
“आम्ही तीनही पक्ष राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार आहोत. आमच्याकडे संख्याबळ आहे. अजित पवारांनी जे केलं ते योग्य नाही. अजित पवारांवर कारवाई करावी लागेल, होईल. मात्र, तो निर्णय कुणी एक व्यक्ती घेणार नाही, बैठकीत यावर निर्णय घेण्यात येईल”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. 
 
भाजपला बहुमत सिद्ध करता येणार नाही, आम्ही पुन्हा तिन्ही पक्ष सरकार स्थापनेचा दावा करून बहुमत सिद्ध करून दाखवू, असं शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रच राहणार आहोत, कुठल्याही परिस्थितीला तीनही पक्ष मिळून तोंड देण्यास तयार आहोत, असं पवारांनी सांगितलं.
 
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्रात रातोरात राजकीय भूकंप पाहायला मिळाला.  भल्या पहाटे महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली. त्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांना शपथही देण्यात आली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मात्र शरद पवार यांनी हा अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं स्पष्ट केलं. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनीही घरात आणि पक्षात फूट पडल्याचं स्टेटस ठेवलं.
 
या सर्व घडामोडीनंतर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते यांनी दुपारी संयुक्त पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. या पत्रकार परिषदेकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं.
 
शरद पवार काय म्हणाले?
 
तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून सरकार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व उमेदवारांनी पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही अपक्ष आमदार असे मिळून आमदारांची संख्या 169-170 च्या आसपास जाते. काल आमची बैठक झाल्यानंतर काही गोष्टी घडल्या. सकाळी साडेसहा पावणे सात वाजता एका सहकाऱ्याने त्यांना राजभवनावर आणल्याचं सांगितलं.
 
नंतर आम्हाला लक्षात आलं की अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे काही आमदार राजभवनावर गेले आहेत. त्यानंतर काही वेळातच टीव्ही चॅनलवर त्यांनी शपथ घेतल्याचं पाहायला मिळालं. अजित पवारांचा निर्णय शिस्तभंगाची कारवाई करावी असा निर्णय आहे.
 
10 ते 11 आमदार त्यांच्यासोबत असल्याची माहिती आहे. हा प्रकार घडल्यानंतर काही आमदारांनी आमच्याशी संपर्क करायला सुरुवात केली. बुलडाण्याचे आमदार डॉ शिंगणे तेथे होते. राजभवनावरुन सुटका झाल्यावर ते माझ्याकडे आले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती