हिंदुत्वाच्या मुद्यावरुन आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

सोमवार, 22 जानेवारी 2024 (13:26 IST)
मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेना(उबाठा गट) आणि भाजपमध्ये नेहमी खटके उडत असतात. अशातच, शिवसेना नेते आदित्य ठाकरे पुन्हा एकदा हिंदूत्वाच्या मुद्यावरुन भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी त्यांचे आजोबा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही आठवण करुन दिली.
 
मुंबईत पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेनेने आमदार अपात्रतेच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा चुकीचा आदेश लोकांसमोर आणण्यासाठी पत्रकार परिषद घेतली, त्यामुळे शिवसेनेच्या सहका-यांना सातत्याने तपास यंत्रणांकडून लक्ष्य केले जात आहे. रवींद्र वायकर, किशोरी पेडणेकर, राजन साळवी यांना शिंदे गटात सामील होण्यासाठी तपास यंत्रणांकडून त्रास आणि धमक्या दिल्या जाताहेत. या नेत्यांकडे लपवण्यासारखे काहीच नाही, म्हणूनच ते उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहतात. यावेळी त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांसाठी देशद्रोही शब्द वापरला. ते म्हणाले, लोकसभा, विधानसभा किंवा इतर कुठल्याही निवडणुकांमध्ये एकही देशद्रोही विजयी होणार नाही याची काळजी घ्या.
 
आदित्य ठाकरे म्हणाले, जेव्हा माझे विरोधक मला टार्गेट करतात, तेव्हा मला फार उत्साह येतो. कारण, मला माहितेय की, माझ्या टीकेचा त्यांना फटका बसला आहे आणि मी योग्य मार्गावर आहे. माझे आजोबा शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही राजकारण, भ्रष्टाचार किंवा पक्ष फोडण्यासाठी हिंदुत्वाचा वापर केला नाही, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती