गोदा आरती सुरू करण्यासाठी १० कोटी रूपयांचा निधी मिळणार

बुधवार, 31 जानेवारी 2024 (09:31 IST)
नाशिक शहरात रामतीर्थावर गोदा आरती सुरू करण्यासाठी प्राथमिक स्वरूपाच्या स्थायी सुविधा पुरविण्यासाठी १० कोटी रूपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवारयांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात गोदावरी आरती संदर्भात आयोजित बैठकीत सुधीर मुनगंटीवार बोलत होते.
 
 मुनगंटीवार म्हणाले की, लोकप्रतिनिधींसोबत शहारात गोदा आरती सुरू करण्याबाबत चर्चा करून सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात यावा. यात डिजिटल एलईडी स्क्रीन, साऊंड सिस्टीम, लाईव्ह स्क्रीनिंग, एलईडी हायमास्ट, कुशल ऑपरेटर्स यासह देखभाल व दुरूस्ती यांचा सामवेश असावा. यासाठी १० कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल. हे काम अडीच महिन्यांच्या कालावधीत वेगाने करावे, असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
 
गोदा प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या ५६  कोटी ४५  लाखांच्या आराखड्यात विद्युत विषयक, स्थापत्य विषयक, जलशुद्धीकरण प्रक्रिया विषयक बाबींसह इतर गोष्टींचा समावेश आहे. लोकप्रतिनिधींशी चर्चा करून यात आणखी आवश्यक बाबींचा समावेश करून सुधारीत प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. जेणेकरून  मुख्यमंत्र्यांसोबत यावर चर्चा करून निधी उपलब्धतेबाबत निर्णय घेता येणे शक्य होईल. याबाबत लवकरच दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात येईल, असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
 
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार  म्हणाल्या की, गोदा प्रकल्पाबाबत सुक्ष्म नियोजन करून यात आरतीसाठी येणाऱ्या भाविकांना बसण्याची व्यवस्था, आरतीच्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी होणार नाही यासाठी प्रवेशासाठी व बाहेर पडण्यासाठीची व्यवस्था, संरक्षण व्यवस्था, त्याचप्रमाणे आरतीचे लाईव्ह स्क्रिनिंगचे नियोजन सुत्रबद्धतेने झाले पाहिजे. गोदा आरती प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिक पर्यटनाला बुस्ट मिळणार असल्याचा विश्वास डॉ. पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

Edited By -  Ratnadeep ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती