ट्रेडिंग व वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवून ४७ लाखांचा गंडा

गुरूवार, 8 फेब्रुवारी 2024 (08:01 IST)
नाशिक : शेअर्स ट्रेडिंग करण्याचे, तसेच वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवून अनोळखी टेलिग्रामधारकाने एका वृद्धासह तीन जणांना सुमारे ४७ लाख रुपयांचा गंडा घालून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत सायबर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मदन रामभाऊ काळे (वय ६०, रा. श्री अॅव्हेन्यू अपार्टमेंट, प्रशांतनगर, पाथर्डी फाटा), तसेच जगदीश देवराम कुटे व पवन लक्ष्मण कदम यांना एका टेलिग्राम व व्हॉट्सअॅपधारक अज्ञात इसमाने संपर्क साधला. फिर्यादी काळे यांच्यासह कुटे व कदम यांना त्यांनी शेअर्स ट्रेडिंगमध्ये भाग घेऊन वर्क फ्रॉम होम केल्यास भरपूर नफा मिळेल, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
 
त्यानंतर अज्ञात भामट्याने फिर्यादीसह तिघांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून टेलिग्राम आयडी, चॅनल, तसेच एक लिंक पाठविली. त्यावर लिंक ओपन करून टास्क पूर्ण करण्यास सांगितले.
 
त्यानुसार या तिघांनीही हे टास्क पूर्ण केली, तसेच शेअर्स ट्रेडिंग करण्याचे व वर्क फ्रॉम होम करण्याचे सांगितले लिंक ओपन करून अज्ञात टेलिग्रामधारक, तसेच वेगवेगळ्या नावांनी ग्रुप तयार करून त्यात सहभागी व्यक्तींनी फिर्यादी काळे यांच्यासह कुटे व कदम यांच्याकडून दि. २५ नोव्हेंबर २०२३ ते दि. २ जानेवारी २०२४ या कालावधीत इंटरनेट व फोनद्वारे वेळोवेळी ४६ लाख ४५ हजार ८७८ रुपयांची स्वीकारून वर्क फ्रॉम होम न देता, तसेच शेअर्स ट्रेडिंगमधील नफ्याची रक्कम न देता आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात सायबर भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती