पश्चिम महाराष्ट्रात महापुरात ४० जणांचा मृत्यू

सोमवार, 12 ऑगस्ट 2019 (10:06 IST)
पश्चिम महाराष्ट्रात महापुरात ४० जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी १९ जण सांगली जिल्ह्यातील आहेत. ब्रह्मनाळमधील बेपत्ता सहा जणांपैकी पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर एक व्यक्ती सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगली, कोल्हापूर भागातील तब्बल २०० रस्ते आणि ९४ पूल बंद असल्याने मदत पोहोचविण्यात अडचणी येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील पूरस्थितीची हवाई पाहाणी केली. पुरामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला रशिया दौरा रद्द केला आहे.
 
राज्यातील दहा जिल्ह्यांत पूरपरिस्थिती असून, ७० तालुके व ७६१ गावे बाधित झाली आहेत. ४,४७,६९५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मदतकार्यात एनडीआरफच्या ३२, एसडीआरफच्या ३, लष्कराच्या २१, नौदलाच्या ४१, तटरक्षक दलाची १६ पथके कार्यरत आहेत. २२६ बोटींद्वारे बचावकार्य सुरू आहे. पुरामुळे ४० व्यक्तींचा मृत्यू झाला, तर चारजण जखमी झाले आहेत, तर ४८ जनावरे मृत्युमुखी पडल्याची माहिती माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती