आरटीई इयत्ता पहिलीच्या २५ टक्के मोफत प्रवेशाची लॉटरी सोडत प्रसिद्ध

मंगळवार, 9 एप्रिल 2019 (09:07 IST)
लहान मुलांच्या मोफत, सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार (आरटीई)  इयत्ता पहिलीच्या २५ टक्के मोफत प्रवेशाची लॉटरी सोडत निघाली आहे. पुणे येथील आझम कॅम्पस येथील सभागृहात लहान मुलांच्या हाताने ० ते ९ क्रमांकामधील चिठठया काढण्यात आल्या असून, दोन दिवसात या क्रमांकाच्या आधारे प्रत्येक शाळेच्या प्रवेशासाठी आलेले अर्ज व उपलब्ध जागा यानुसार संगणकीय पध्दतीने प्रवेश निश्चित  होतील. 
 
या प्रवेशाची सोडत निघाल्यानंतर त्याआधारे येणाऱ्या पुढील दोन दिवसात संगणकीय प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर प्रवेशाची यादी जाहीर केली जाणार असून मुलांचे प्रवेश निशित होणार आहेत. नोंदवलेल्या मोबाइल क्रमांकावर एसएमएसव्दारे पालकांना  प्रवेश मिळाल्याचे कळविले जाणार आहे. जर  मेसेज आला नाही तरी पालकांनी आरटीईच्या संकेतस्थळावर अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाची खात्री पालकांनी करून घ्यायची आहे. पूर्ण राज्यात एकूण ९ हजार १९५ शाळांमध्ये १ लाख १६ हजार ९२६  जागा आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध असून, राज्यभरातून तब्बल २ लाख ४६ हजार ३४ अर्ज उपलब्ध झाले आहेत. तर पुण्यात ९६३ शाळांमधून १६ हजार ६०४ जागांसाठी सर्वाधिक ५४  हजार १३९ अर्ज आले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती