घोड्यांच्या शर्यतीवर बेकायदेशीरपणे बेटिंग, २७ बडे बुकी गजाआड

शनिवार, 12 डिसेंबर 2020 (16:04 IST)
रेसकोर्स येथील घोड्यांच्या शर्यतीवर बेकायदेशीरपणे बेटिंग घेणाऱ्यावर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केलीआहे. यात शहरातील विविध चार ठिकाणी एकाचवेळी छापे घालण्यात आले. त्यात २७ बडे बुकी तसेच खेळायला येणाऱ्यांवर कारवाई करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी वानवडी, कोंढवा, हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 
याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शब्बीर मोहसीन खंबाटी (वय ७०, रा. पदमव्हिला सोसायटी, वानवडी) यांना अटक केली आहे. सध्या मुंबई येथील रेसकोर्सवर कोराना सेंटर तयार केले असल्याने तेथील शर्यती पुण्यात होत आहेत. रेसकार्समध्ये शासनाचा परवाना घेऊन त्यांचा सर्व कर भरुन बेटिंग घेणाऱ्यांना परवाना दिला जातो. मात्र, त्याशिवाय क्रिकेटप्रमाणे टीव्हीवर शर्यती पाहून हे बेटिंग घेत होते. घोड्यांच्या नावाने बेटिंग घेत होते. या बंगल्यातून पोलिसांनी बेटिंग घेण्यासाठी वापरलेले साहित्य तसेच मोबाईल असा ५१ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
 
घोरपडी येथील महालक्ष्मी मंदिराजवळील डोबरबाडी येथे मोकळ्या मैदानात बेकायदेशीरपणे बेटिंग घेण्यात येत होते. याठिकाणी पोलिसांनी छापा घालून बेटिंग घेणारे व खेळणारे अशा २० जणांना अटक केली आहे. याबरोबरच हडपसर तसेच कोंढवा येथे छापा घालून बेटिंग घेणार्यांना अटक करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती