किरकोळ कारणावरून धावत्या रेल्वेतून फेकले तरुणाला; २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

शुक्रवार, 1 मार्च 2024 (08:53 IST)
रेल्वेने मुंबईहून मनमाड मार्गे मध्य प्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या एका तरुणावर मोबाईल चोरीचा आळ घेऊन मारहाण करून धावत्या रेल्वेतून ढकलून दिल्याने २९ वर्षीय तरुणाचा मूत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने प्रवासात मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी सहप्रवाशाने पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, रोजगारासाठी मुंबई येथे आलेला रोहितकुमार मुकेश गोस्वामी (वय २९, रा.रामनगर गधाई, झंडा ता. नरवार जि. शिवपुरी, मध्यप्रदेश) पुन्हा आपल्या गावाकडे गाडी क्रं.१२१३७ मुबंई - फिरोजपुर पंजाब मेल या गाडीतील जनरल डब्यातून प्रवास करीत होता.
 
मनमाड रेल्वे स्थानकात गाडीने थांबा घेतल्यानंतर गाडीत २५ ते ३० वर्षीय असलेला, रंगाने निमगोरा, अंगात हिरव्या निळ्या लाल रंगाच्या चौकटी शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेला, मराठी व हिंदी भाषा बोलता असलेल्या अज्ञात तरुणाने रोहीतकुमार मुकेश गोस्वामी यास मोबाईल चोरी केल्याचा आरोप करुन लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. सहप्रवाशांनी समजविण्याचा प्रयत्न केला असता अज्ञात तरुणाने सहप्रवाशांना देखील शिवीगाळ केली आणि रोहीतकुमार यांच्या वडीलांना फोनवर रोहीत यास रेल्वेतुन खाली फेकुन देण्याची धमकी दिली.
 
त्यानंतर मनमाड स्थानकातून पंजाब मेल भुसावळकडे प्रस्थान होत असतांना धावत्या गाडीतून रोहितकुमार गोस्वामीला फेकून दिल्याने त्याचा मृत्यू झाला असे सहप्रवासी अजयकुमार श्यामसुंदर साहू (वय २९, रा. चेनपूरा, ता. पटियाला जि. दमो, मध्यप्रदेश) दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. मनमाड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमावर भादंवी ३०२, ३२३, ५०४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
 
सदरील घटना ही रोहित कुमार याच्या कुटुंबियांना समजतात त्याचे वडील मुकेश गोस्वामी आणि कुटुंबातील काही व्यक्ती हे मनमाड येथे आले आणि मयत रोहित कुमार याचा मृतदेह ताब्यात घेऊन एका खाजगी रुग्णवाहिकेद्वारे आपल्या गावाकडे मयत रोहित कुमार याचा अंत्यविधी करण्यात आला.
 
दरम्यान रोहितला पत्नी असून एक लहान मुलगी असल्याचे मुकेश गोस्वामी यांनी सांगितले. ह प्रकार हा संशयास्पद असून याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मयत रोहितकुमार याचे वडील मुकेश गोस्वामी यांनी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती