मृतदेह पाहिल्यावरही पोलिसांना तो वीरप्पनच आहे याची खात्री का नव्हती? त्याच्या मृत्यूबद्दल प्रवाद का?

सोमवार, 7 ऑगस्ट 2023 (23:58 IST)
"वीरप्पन जर जंगलातच थांबला असता तर तो कोणाच्याही हाती लागला नसता."
हे मत वीरप्पनच्या कोणत्या साथीदाराचं नसून वीरप्पनला पकडणाऱ्या स्पेशल टास्क फोर्समधील तत्कालीन पोलिस अधीक्षक सेंथामराइकन्नन यांचं मत आहे.
 
सेंथामराइकन्नन वीरप्पनचं वर्णन करताना म्हणतात, "त्याची कोणतीही कमजोरी नव्हती. ना त्याला बाईचं वेड होतं, ना दारूचं. ना तो देवाला घाबरायचा, ना ज्योतिषावर विश्वास ठेवायचा. त्याला जे आवडायचं ते तो करायचा. त्याने त्याच्या आयुष्यात रक्ताचे पाट वाहताना पाहिले होते. थोडक्यात त्याला कशाचीही भीती नव्हती."
 
जवळपास एक दशकाहून अधिक काळ पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरलेला वीरप्पन 18 ऑक्टोबर 2004 रोजी पोलिसांच्या तावडीत सापडला. तामिळनाडू पोलिसांसाठी तो एक संस्मरणीय दिवस होता.
 
ऑपरेशन 'ककून'
पहिल्यांदाच जंगलातून बाहेर आलेल्या वीरप्पनला तामिळनाडू टास्क फोर्सने धर्मपुरी जिल्ह्यातील पप्पिरेट्टीपट्टीजवळ गोळ्या घालून ठार केलं.
 
तामिळनाडू टास्क फोर्सचे प्रमुख विजयकुमार आणि टास्क फोर्सच्या गुप्तचर शाखेचे विशेष पोलिस अधीक्षक असलेले सेंथामराइकन्नन हे या ऑपरेशनचे मुख्य सूत्रधार होते.
 
चंदन तस्कर वीरप्पनला मारल्यानंतर त्याच्या शेवटच्या क्षणाबद्दल खूप सारी धक्कादायक माहिती समोर येत राहिली. पण टास्क फोर्सकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
 
त्याच्या मृत्यूबद्दल वेगवेगळे दावे प्रतिदावे देखील केले गेले. 2017 साली आयपीएस विजयकुमार यांनी 'चेसिंग द ब्रिगंड' नावाचं पुस्तक लिहिलं. यात ऑपरेशन 'ककून' विषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
 
यात त्यांनी वीरप्पनला ज्या पद्धतीने मारलं त्याविषयी लिहिलं असून सर्व आरोप निराधार असल्याचं म्हटलं.
 
पण आता याप्रकरणाला नवीनच कलाटणी मिळाली आहे. मागच्या शुक्रवारी म्हणजेच 4 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'द हंट फॉर वीरप्पन' हा माहितीपट प्रदर्शित झाला असून यात तत्कालीन पोलिस अधीक्षक सेंथामराइकन्नन यांनी वीरप्पनला कसं मारलं याविषयी माहिती दिली आहे. मात्र विजयकुमार यांच्या 'चेसिंग द ब्रिगंड' पुस्तकात तर याविषयी वेगळेच खुलासे आहेत. त्यामुळे याविषयी विरोधाभास असल्याचा आरोप होत आहे.
 
विजयकुमार आणि सेंथामराइकन्नन यांना माहिती मिळाली होती की, वीरप्पनला डोळ्यांचा त्रास सुरू झालाय आणि त्यावर उपचार घेण्यासाठी तो श्रीलंकेला जाणार आहे. आणि त्याचवेळी एलटीटीईमध्ये सामील होणार आहे.
 
त्यांनी या परिस्थितीचा फायदा उठवून वीरप्पनला पकडण्याची योजना आखली. विजयकुमार आणि सेंथामराइकन्नन सांगतात की 'ऑपरेशन ककून' ही नियोजित योजना होती, त्याआधारेच वीरप्पनला गोळ्या घालण्यात आल्या.
 
टास्क फोर्समधील कोणता व्यक्ती वीरप्पनच्या संपर्कात होता?
एका साप्ताहिकासाठी काम करणारे शिवसुब्रमण्यम हे असे पाहिले व्यक्ती होते ज्यांनी वीरप्पनचा फोटो काढला होता. कन्नड अभिनेता राजकुमारला वीरप्पनने ओलिस ठेवलं होतं, त्यावेळी तामिळनाडू सरकारने वाटाघाटीसाठी पाठवलेल्या पथकात शिवसुब्रमण्यम देखील होते.
 
शिवसुब्रमण्यम विचारतात की, "वीरप्पनची हत्या कशी झाली याचं गूढ कायमच आहे. या दोघांपैकी कोणीच याची माहिती दिलेली नाही. विजयकुमार यांच्या पुस्तकात बऱ्याचशा गोष्टी लपविण्यात आल्या आहेत. तर सेंथामराइकन्नन यांनी देखील त्यांच्या मुलाखतीत बऱ्याचश्या गोष्टी सांगण्याचं टाळलं. वीरप्पनच्या शेवटच्या क्षणाविषयी माहिती देताना दोघेही परस्परविरोधी का बोलत आहेत?"
 
शिवसुब्रमण्यम यांनी या दोघांमधील विरोधाभासाबद्दल बीबीसीशी सविस्तर चर्चा केली.
 
ते विचारतात, "जेव्हा वीरप्पनने त्याच्या डोळ्यांवर उपचार करून घेण्यासाठी आणि एलटीटीई मध्ये सामील होऊन शस्त्रास्त्र मिळविण्यासाठी संपर्क केला तेव्हा पोलिस दलातील सहाय्यक निरीक्षक वेल्लाथुराई हे एलटीटीईचे सदस्य असल्याची ओळख करून देण्यात आली होती. विजयकुमार सांगतात की, वीरप्पनच्या माणसांशी त्यांची ओळख झाली होती. पण माहितीपटात दिलेल्या मुलाखतीत सेंथामराइकन्नन सांगतात की, मी स्वतः वीरप्पनशी संपर्क केला होता. आता या दोघांपैकी नेमकं कोण खरं बोलतंय यावर स्पष्टीकरण कोण देणार?"
 
वीरप्पनला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेची खिडकी आतून उघडता येत नव्हती का?
 
वीरप्पनची मुलगी विद्याने देखील हाच प्रश्न उपस्थित केलाय. सोबतच तिने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, वीरप्पनने शेवटी ज्या रुग्णवाहिकेतून प्रवास केला त्यातही दोघांच्या मतांमध्ये विसंगती आढळते.
 
विद्या सांगते की, "विजयकुमार यांच्या पुस्तकात त्यांनी नमूद केलंय की, वीरप्पनला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेत काही बदल करण्यात आले होते. या रुग्णवाहिकेचे दरवाजे आतून उघडता येत नव्हते, त्याच ठिकाणी गोळ्या झाडण्यात आल्या. पण सेंथामराइकन्नन म्हणतात की, रुग्णवाहिका थांबली तेव्हा वीरप्पनने त्याचं डोकं बाहेर काढलं होतं. आता या दोघांपैकी नेमकं कोण खरं आहे. खरं तर या दोघांच्या बोलण्यात तथ्य नाही, त्यांनी माझ्या वडिलांना जिवंत पकडलं होतं."
 
विद्या पुढे सांगते की, पूर्वी तिला पोलीस अधिकाऱ्यांविषयी आदर वाटत होता. पण आता तिच्या वडिलांच्या मृत्यूबद्दलच्या परस्परविरोधी बातम्यांमुळे तो आदर संपल्यात जमा आहे.
 
ती म्हणते, "ते अधिकारी होते आणि त्यांनी माझ्या वडिलांना मारलं हे त्यांचं काम होतं. याचं त्यांना बक्षीस मिळालं, हे त्यांच्या आयुष्यभरातील मोठं यश होतं. पण तो व्यक्ती कसा मेला हे लपवून पुस्तकच का लिहिलं? हे पुस्तक म्हणजे निव्वळ नाटकीपणा असून त्यात बऱ्याच गोष्टी लपवल्या आहेत असं वाटतं. आपण जे केलंय त्याबद्दल प्रामाणिक न राहणारे लोक त्यांच्या कामात तरी प्रामाणिक असतील का? असा प्रश्न पडतो."
विद्या सांगते, "पोलिसांनी माझ्या वडिलांना आणि आईला खूप त्रास दिला. आम्हाला याविषयी जास्त काही माहित नाही. पण माझ्या मनात पोलिसांविषयी आदर होता. पण तो आता नाहीसा झालाय."
 
"पोलिसांच्या अत्याचारात केवळ महिलांचेच नाही तर अनेक लोकांचे प्राण गेले. सथशिवम आयोगाच्या अहवालानुसार, पीडितांना अद्यापही कोणतीही भरपाई मिळालेली नाही."
 
सेंथामराइकन्नन यांनी काय सांगितलं?
वीरप्पनच्या मृत्यूबद्दल आणि त्यावरून उपस्थित होणारे प्रश्न आणि आरोपांवर बीबीसीशी बोलताना सेंथामराइकन्नन म्हणाले की, वीरप्पनला ज्या प्रकारे मारण्यात आलं तो तसा व्यक्ती नव्हता.
 
"ज्यांना सत्य परिस्थिती माहिती नाही, ते असं बोलतात. किंबहुना त्याला पकडून त्याच्या अन्नात विष टाकून मारलं असतं तरी मोठी अडचण निर्माण झाली असती. त्याहीपेक्षा वीरप्पनला मारून टाकावं असा तो माणूस नव्हता. आम्हाला त्याला जिवंत पकडायचं होतं, पण परिस्थितीच अशी होती की त्याला तसं पकडणं निव्वळ अशक्य होतं."
 
या प्रकरणातील विरोधाभासाबद्दल बोलताना ते सांगतात की, "या ऑपरेशनसाठी रुग्णवाहिकेत विशेष बदल करण्यात आले होते. खिडकी आणि मागचा दरवाजा बाहेरूनच उघडता येईल अशा पद्धतीने तयार करण्यात आले होते. रुग्णवाहिकेचे चालक सरवणन आणि ड्युरा हे पुढच्या बाजूला असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी चालकाची बाजू आणि मागील प्रवासी बाजू यांच्यामधील लहान खिडकी देखील बंद करण्यात आली होती. त्या दोघांच्या सुरक्षेसाठी ही तजवीज करण्यात आली होती."
 
सेंथामराइकन्नन यांनी वीरप्पनला मिशा काढायला सांगितल्या होत्या का?
वीरप्पनला जंगलातून बाहेर काढण्यासाठी त्याच्याशी एलटीटीईचा सदस्य म्हणून कोणी संपर्क साधला होता? या विरोधाभासावर बोलताना सेंथामराइकन्नन म्हणतात की, सुरुवातीपासून वीरप्पनशी तेच बोलत होते.
 
सेंथामराइकन्नन सांगतात, "ऑपरेशनच्या एक आठवडा किंवा जास्तीत जास्त एक महिना आधी वेल्लाथुराईने वीरप्पनशी संपर्क साधला. पण त्याआधीही मीच वीरप्पनच्या संपर्कात होतो. आमच्या संभाषणादरम्यान, मीच त्याला मिशा काढण्यास सांगितलं होतं."
 
तुम्ही स्वतः त्याला ते सांगितलं का? असं विचारल्यावर सेंथामराइकन्नन सांगतात की, "मिशा असल्यावर काय अडचण होईल का? असं त्याने विचारलं. यावर मी त्याला सांगितलं की, तुला दवाखान्यात जावं लागेल आणि मग बोटीने श्रीलंकेला जावं लागेल. तू मिशा काढल्यास तर तुला कोणीही सहज ओळखू शकणार नाही. त्यानुसार त्याने मिशा काढल्या."
 
त्यांनी पुढे सांगितलं की, "आमच्या पैकी कोणीच त्याला प्रत्यक्ष पाहिलेलं नव्हतं. ऑपरेशन ककून संपल्यानंतर आम्हाला त्याला मिशीशिवाय ओळखता आलं नाही. आमच्या टीममधल्या अनेकांना तो खरंच वीरप्पन आहे का? यावर शंका होती. पण वीरप्पनचा पुतण्या आमच्या टास्क फोर्समध्ये होता. त्यानेच आम्हाला सांगितलं की, हेच आमचे काका आहेत, सर"
 


Published By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती