हरियाणाच्या नूंह आणि गुरूग्राममध्ये हिंसेचं लोण, दगडफेक आणि जाळपोळ

मंगळवार, 1 ऑगस्ट 2023 (15:08 IST)
हरियाणाच्या मेवातमध्ये सोमवारी झालेल्या जातीय हिंसाचाराचं लोण गुरुग्रामपर्यंत पोहोचलं आहे. तिथे सेक्टर 57 मध्ये मशिदीत आग लावली आहे.या हल्ल्यात मशिदीच्या इमामांचा मृत्यू झाला आहे आणि एक व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत.
 
मशिदीच्या व्यवस्थापक समितीचे चेअरमन अस्लम खान यांनी बीबीसीला सांगितलं, “या हल्ल्यात मशिदीचे इमाम मोहम्मद साम यांचा मृत्यू झाला आहे.”.
 
गुरुग्राम पूर्वचे पोलीस उपायुक्त नीतीश अग्रवाल यांनी या हल्ल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे.
 
मात्र संपूर्ण गुरुग्राममध्ये गेल्या रात्रीच्या घटनेनंतर हिंसाचाराच्या घटनेची कोणतीही माहिती नाही.
 
हरियाणाच्या नूंह जिल्ह्याच्या मेवातमध्ये सोमवारी धार्मिक यात्रेदरम्यान दोन गटात तणाव निर्माण झाला आहे. त्यात एकूण 20 लोक जखमी झाले आहे.
 
या परिसरात शांतता प्रस्थापित करणं ही प्राथमिकता असल्याचं हरियाणा सरकारने म्हटलं आहे. केंद्र सरकारला अतिरिक्त पोलीस फौजफाटा पाठवण्याची विनंती करण्यात आल्याचं गृहमंत्री अनिल विज म्हणाले आहेत.
 
त्याचवेळी विश्व हिंदू परिषदेने राज्यातलं सरकार आणि पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. काँग्रेसने लोकांना शांतता बाळगण्याचं आवाहन केलं आहे.
 
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर जातीय तणावाच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हणाले, “आजची घटना दुर्दैवी आहे. मी सर्व लोकांना शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन करतो. दोषी लोकांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल.”
 
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी नूहमध्ये फ्लॅग मार्च काढला. त्यातच प्रशासनाने जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री मोबाईल इंटरनेटवर बंदी आणली आहे. नूंहच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री साडेआठ वाजता दोन्ही गटांची बैठक बोलावली होती.
 
ANI ने शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये घटनास्थळावर बराच फौजफाटा तैनात असल्याचं दिसून येत आहे. व्हीडिओमध्ये काही ठिकाणी आग लागल्याचंही दिसत आहे.
 
नूंह येथील स्थानिक पत्रकार शाहिद यांनी दिलेल्या माहितीनुसार, “इथे यात्रेदरम्यान हा गोंधळ झाला आहे. अनेक दुकानांमध्ये आणि गाड्यांना आग लावण्यात आली आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.”
 
त्याचवेळी हरियाणाच्या सोहनामध्येही दोन गटात तणाव निर्माण झाल्याची बातमी आहे. तिथेही मोठ्या संख्येने पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे.
 
मेवातमध्ये बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने जलाभिषेक यात्रा काढण्याची घोषणा केली होती. यात मोनू मानेसर सुद्धा सहभागी होणार होतात.
 
मोनू मानेसर हा नासिर जुनैद हत्या प्रकरणात आरोपी आहे आणि सध्या फरार आहे.
 
प्रसारमाध्यमात आलेल्या बातम्यांमध्ये दावा केला जात आहे की मोनू मानेसर या यात्रेत सहभागी झाल्यावर दगडफेक झाली. मेवातचे लोक मोनू मानेसर मध्ये शोभा यात्रेत सामील होण्याचा विरोध करत होते.
 
या हिंसाचारानंतर विश्व हिंदू परिषदेने एक निवेदन जारी केले. ही पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांची चूक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
 
विश्व हिंदू परिषदेने जारी केलं निवेदन
 
विश्व हिंदू परिषदेने हिंसाचाराचा निषेध केला असून त्यासाठी मुस्लीम समुदाय आणि प्रशासनाला जबाबदार ठरवलं आहे.
 
विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी एक निवेदन जारी केलं आहे. ते म्हणाले, “आज मेवात मध्ये नूंह येथील नल्हण महादेव च्या मंदिरापासून बृज मंडलपर्यंत यात्रा निघणार होती आणि जलाभिषेक होणार होता. दरवर्षी हा कार्यक्रम होतो. त्यात 20 हजार लोक भाग घेतात. त्याची तयारी पोलिसांनी केली नाही मात्र मुसलमानांनी केली. अनेक दिवस दगडं गोळा केली जात होती, योजना तयार केली जात होती.”
 
“ही यात्रा एक किलोमीटरभर गेली आणि हल्ला झाला. हा हल्ला नियोजित होता. लोकांच्या मागे धावून धावून त्यांना मारण्यात येत होतं. दगडफेक झाली, आग लावली गेली आणि गोळ्या चालवल्या गेल्या. हा भाग संवेदनशील आहे. तिथे काहीच पोलीस बंदोबस्त नव्हता याचं मला आश्चर्य वाटतं. मला असं वाटतं की ही गुप्तचर विभागाची चूक आहे.”
 
त्याबरोबरच आलोक कुमार यांनी इशारा दिला, “मी हेही सांगतो की आम्ही फक्त सरकारची मदत घेणार नाही. आम्हाला आत्मरक्षणाचा अधिकार आहे. हिंदू त्यांच्या रक्षणासाठी या अधिकारांचा उपयोग करून या प्रकाराचा सामना करतील आणि त्याचे जे परिणाम होतील त्याची जबाबदारी आमची नाही.”
 
“आम्ही सामना करू, भयभीत होणार नाही आणि मेवात हिंदूसाठी सुरक्षित क्षेत्र करू.” असंही ते या निवेदनात म्हणाले.
 
हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी आधीच निवेदन जारी केलं आहे की केंद्र सरकार सैन्याची तुकडी तिथे पाठवत आहे.
 
राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मागितली मदत
 
बीबीसीचे सहयोगी पत्रकार सत सिंह यांनी सांगितलं की वीएचपीच्या यात्रेदरम्यान अनेक गाड्या जाळल्या गेल्या आणि जोरदार तोडफोड करण्यात आली आहे.
 
गृहमंत्री अनिल विज यांनी कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्याचे आदेश दिल्याची माहितीही सत सिंह यांन दिली आहे.
 
सध्या मेवातचे पोलीस अधीक्षक सुटीवर आहेत. त्यामुळे पलवल जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांकडे या जिल्ह्याचा कार्यभार आहे,
 
काँग्रेसचे आमदार आफताब अहमद यांनी शांतता पाळण्याचे आवाहन केलं आहे.
 
मोनू मानेसरची प्रतिक्रिया
वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मोनू मानेसर म्हणाले, “विश्व हिंदू परिषदेच्या सल्ल्यानंतर मी त्या यात्रेत सामील झालो नाही. विश्व हिंदू परिषदेला वाटलं की माझ्यामुळे हिंसा भडकू शकते.”
 
फेब्रुवारी 2023 मध्ये हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यातक जळलेल्या अवस्थेत बोलेरो गाडी सापडली होती.
 
ती जाळण्याच्या मागे, तसंच दोन युवकांना जाळून मारण्याच्या चौकशीत मोनू मानेसर यांचं नाव आलं होतं. तेव्हापासून तो फरार आहे. त्याला अटक करण्यासाठी एक टीम नुंहला पाठवली होती.
 

Published By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती