रक्तासाठी भरमसाठ पैसे मोजण्याची गरज भासणार नाही

शनिवार, 6 जानेवारी 2024 (12:44 IST)
आता रक्तासाठी भरमसाठ पैसे मोजण्याची गरज भासणार नाही. रक्तपेढ्या केवळ प्रक्रिया शुल्कच आकारणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून रक्त विकण्यासाठी नसते असे सांगत याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.
 
गेल्या अनेक दिवसांपासून रक्तपेढ्यांवर रक्त देताना जादा दर आकारले जात असल्याच्या तक्रारी सरकारकडे येत आहेत. रक्तपेढ्यांकडून जादा दर आकारल्याच्या तक्रारींवर केंद्र सरकारने कडक भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना सरकारनं दिल्या आहेत. रक्तपेढ्या रक्ताची विक्री करू शकत नाहीत असे म्हणत केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषध नियंत्रकांना पत्रे लिहिली आहेत. २६ सप्टेंबर रोजी झालेल्या औषध सल्लागार समितीच्या ६२ व्या बैठकीचा संदर्भ देत डीसीजीआयने २६ डिसेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात रक्तासाठी अधिक शुल्क आकारण्याबाबत एटीआर पॉइंट तीनच्या अजेंडा क्रमांक १८ संदर्भात शिफारस केली आहे असे मत व्यक्त करण्यात आले आहे.
 
रक्त विकण्यासाठी नाही, ते फक्त पुरवठ्यासाठी आहे, त्यामुळे रक्तपेढ्या केवळ प्रक्रिया शुल्क आकारू शकतात. डीजीसीआयने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषध नियंत्रकांना त्यांच्या अधिकारक्षेत्रातील सर्व रक्तपेढ्यांना सुधारित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश देण्यास सांगितले आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्तदान न केल्यास खासगी रुग्णालयांकडून प्रति युनिट रक्ताची किंमत ३,००० ते ८,००० रुपये ठेवली जाते. रक्ताची कमतरता किंवा दुर्मिळ रक्तगटाच्या बाबतीत, हे शुल्क जास्त असू शकते.
 
प्रक्रिया शुल्क आकारण्याची परवानगी
सर्वोच्च औषध नियामकाने म्हटले आहे की, रुग्णालयं आणि रक्तपेढ्या आता रक्तदान करण्यासाठी केवळ प्रक्रिया शुल्क आकारू शकतात. तसेच, अधिक शुल्क आकारण्याची प्रथा थांबविण्यासाठी नियामकाने इतर सर्व शुल्क काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषध नियंत्रकांना आणि सह-परवाना अधिर्का­यांना पाठवलेल्या पत्रात, भारतीय औषध नियंत्रक जनरलने लिहिले आहे की, रक्त विक्रीसाठी नाही. दरम्यान, रक्तपेढ्यांवर जादा शुल्क आकारले जात असल्याचे सांगत हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
आता फक्त १५५० रुपयेच भरावे लागणार
रक्तदान केल्यानंतरही लोकांकडून नेहमीच प्रक्रिया शुल्क आकारले जाते. अशातच, नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, केवळ प्रक्रिया शुल्क आकारले जाऊ शकते, जे रक्त किंवा रक्त घटकांसाठी २५० ते १,५५० रुपयांच्या दरम्यान आहे. उदाहरणार्थ, संपूर्ण रक्त किंवा पॅक केलेल्या लाल रक्तपेशींचे वितरण करताना १,५५० रुपये शुल्क आकारले जाऊ शकते तर प्लाझ्मा आणि प्लेटलेट्सचे शुल्क प्रति पॅक ४०० रुपये असेल.
 
 
Edited By -  Ratnadeep ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती