भारतीय हवामान खात्याचा अंदाज

गुरूवार, 16 मे 2019 (14:52 IST)
गेल्या वर्षी दुष्काळाने होरपळलेल्या भारतातील शेतकर्‍यांना यंदा मान्सूनचा दिलासा लवकर मिळण्याची शक्यता कमी आहे. यावर्षी मान्सून 6 जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन 12 जूनच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे.  
 
केरळात 4 जून रोजी मान्सून दाखल होण्याची चिन्हे आहेत, असा अंदाज 'स्कायमेट' या खासगी हवामान संस्थेने व्यक्त केला होता. देशातील चारही प्रदेशांमध्ये तो सरासरीपेक्षा कमीच असेल, असेही संस्थेने सांगितले होते. त्यानंतर बुधवारी भारतीय हवामान खात्यानेही मान्सूनचा अंदाज व्यक्त केला आहे. केरळच्या सुमुद्रकिनार्‍यावर 6 जून रोजी मान्सून धडकेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सहा ते सात दिवसांनी महाराष्ट्रातही दाखल होतो. मात्र यंदा केरळमध्येच उशिराने आगमन होणार असल्याने महाराष्ट्रातील आगमनही लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
 
गेल्या मोसात महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाड्याला कमी पावसामुळे मोठा फटका बसला. आगामी मान्सूनकडे डोळे लावून बसलेल्या या भागातील शेतकर्‍यांना यंदाही मान्सून हुलकावणी देण्याची शक्यता आहे. मध्य भारतात समावेश होणार्‍या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम मध्य प्रदेश व गुजरातमध्ये यंदा सरासरीच्या 91 टक्के पाऊस पडण्याची चिन्हे आहेत.
 
गेल्या पाच वर्षांपैकी तीन वर्षे मान्सून केरळमध्ये वेळापत्रकापेक्षा 6 ते 8 दिवस उशिराने दाखल झाल्याचे दिसून आले आहे. 2014 मध्ये 6 जून, 2015 मध्ये 5 जून, 2016 मध्ये 8 जून, 2017 मध्ये 30 मे व 2018 मध्ये 29 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. दरम्यान, केरळमधील मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्यामुळे राज्यातही तो उशिराने दाखल होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. 
 
राज्यात 12 जून रोजी मान्सून दाखल होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर पुणे, मुंबईत तो 14 किंवा 15 जून रोजी डेरेदाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगालचा उपसागर, अंदान-निकोबार बेटे येथे तो 18 किंवा 19 जून रोजी दाखल होईल, असेही नमूद करण्यात आले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती