कोरोनाचे दुष्परिणाम संपले नाहीत आयुष्य १ वर्ष ६ महिन्यांनी कमी झाले

सोमवार, 18 मार्च 2024 (11:51 IST)
कोरोनाचे दुष्परिणाम संपले नाहीत. कोरोना झालेल्यापैकी काही जणांवर अजून त्यांचे परिणाम जाणवत आहेत. एकंदरीत सर्व मानव जातीसाठी चिंता निर्माण करणारी बातमी समोर आली आहे. वैद्यकीय विज्ञानामुळे मानवाचे वाढलेले आयुष्य कोरोनाने कमी केले आहे. कोरोनानंतर मानवाचे सरासरी आयुष्य १ वर्ष ६ महिन्यांनी कमी झाले आहे. ‘द लॅन्सेट जर्नल’ने केलेल्या संशोधनात ही माहिती समोर आली.
 
नवीन वैद्यकीय सुविधांमुळे मानवाचे आयुष्य वाढत होते. १९५० मध्ये मानवाचे सरासरी वय ४९ वर्षे होते, ते २०१९ मध्ये ७३ वर्षांपेक्षा जास्त झाले. परंतु २०१९ मध्ये कोरोना आला. त्यानंतर ही प्रक्रिया उलटी झाली. २०१९ ते २०२१ दरम्यान मानवाचे सरासरी आयुष्य १ वर्ष ६ महिन्यांनी घटले आहे. कोरोनोचा हा सर्वात गंभीर दुष्परिणाम समोर आला आहे. जगातील ८४ टक्के देशांमधील आयुर्मान घटल्याचे अहवालात म्हटले आहे.
 
पुरुषांचा मृत्यूदर २२% वाढला
कोरोना दरम्यान १५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पुरुषांचा मृत्यूदर २२ टक्के वाढला आहे. महिलांमध्ये हे प्रमाण १७ टक्के वाढले आहे. २०२० आणि २०२१ दरम्यान जगात १३.१ कोटी लोकांचा मृत्यू झाला. त्यात १.६ कोटी मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे कोविड-१९ बालकांचा मृत्यूदर कमी झाला. २०१९ तुलनेत २०२१ मध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांचा मृत्यूदर कमी झाला आहे.
 
नवीन संशोधनामुळे कोरोनातून बरे झालेल्यांना इतर आजार होत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. कोरोना झालेले काही लोक अनेक आजारांनी त्रस्त होत आहेत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती