नीट, जेईई परीक्षेवर स्थगितीसाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल

शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020 (16:43 IST)
नीट आणि जेईई परीक्षेवर स्थगिती आणली जावी यासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. सहा राज्यांकडून ही याचिका दाखल करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची तसंच प्रवासात येणाऱ्या अडचणींची दखल घेतली नसल्याचं पुनर्विचार याचिकेत म्हटलं गेलं आहे.
 
१७ ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. या निर्णयाविरोधात बिगरभाजप सहा राज्यांनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.
 
याआधी जेईई व नीट परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या परीक्षा घेण्यासंदर्भात विद्यार्थी व पालकांचाच दबाव येत असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल-निशंक यांनी स्पष्ट केले आहे. जेईई परीक्षा १-६ सप्टेंबर तर नीटची परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती