शिवसेनेने औरंगजेबाची जयंतीही साजरी करावी, संजय पांडे यांचा टोला

मंगळवार, 19 जानेवारी 2021 (16:08 IST)
शिवसेना टिपू सुलतानची जयंती साजरी करणार असल्याचे वृत्त ऐकून मोठा धक्का बसला, असं म्हणत भाजपा प्रदेशचे उत्तर भारतीय मोर्चेचे अध्यक्ष संजय पांडे यांनी शिवसेनेने औरंगजेबाची जयंतीही साजरी करावी असा टोला लगावला आहे.
 
टिपू सुलतानच्या जयंतीवरुन पांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ज्या टिपू सुलतानाने असंख्य हिंदू बांधवांचे सक्तीने धर्मांतर केले, अशा क्रूरकर्म्याची जयंती शिवसेना साजरी करणार आहे. सत्ता टिकविण्यासाठी शिवसेना औरंगजेबाची जयंतीही साजरी करायला शिवसेना मागेपुढे पाहणार नाही, अशा शब्दांमध्ये पांडे यांनी शिवसेनेवर टीका केलीय.
 
पांडे यांनी आपली भूमिका जाहीर करणारं एक पत्रकच जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी, टिपू सुलतानाचा इतिहास शिवसेनेला माहीत नसेल असे म्हणता येणार नाही. तरीही शिवसेना टिपूची जयंती साजरी करायला निघाली आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांना हिंदुत्वासाठी लढणे शिकवले, त्याच शिवसेनेने टिपू सुलतानची जयंती साजरी करावी यासारखी दुःखदायक गोष्ट नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी प्रसंगी सत्ताही लाथाडली त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला सत्तेसाठी कोणत्या थराला जावे लागते आहे हेच यातून दिसतं आहे, असं म्हटलं आहे. पत्रकाच्या शेवटी, शिवसेनेने एवढ्यावरच थांबू नये, आता शिवसेनेने औरंगजेबाची जयंतीही साजरी करावी, असा खोचक टोलाही पांडे यांनी लगावला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती