मुंबई ते पुणे सुपर फास्ट : याच महिन्यात मुंबई-पुणे हायपरलूपचे होणार भूमिपूजन

शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019 (16:24 IST)
मुंबईहून अवघ्या ३० मिनिटात पुणे येथे पोहोचायचे स्वप्न पुढील काही वर्षांत प्रत्यक्षात उतरणार आहे. विमानाने नव्हे, तर ‘हायपरलूप’च्या माध्यमातून ही दोन शहरे केवळ २३ मिनिटांच्या अंतरावर जोडली जाणार आहे. मुंबई-पुणे मार्गावरील अतिशय महत्त्वाकांक्षी हायपरलूप प्रकल्पाचे याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबर महिन्यात लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते याच महिन्यात करण्याची योजना असल्याचे मंत्रालयातील सूतोवाच केले आहे.
 
मुंबईहून पुणे गाठण्यासाठी एक्स्प्रेस वे वरून साडेतीन तासांचा वेळ लागतो. तर मुंबई-पुणे हायपरलूप ट्रेन (किंवा पॉड)ने केवळ २३ मिनिटांत हे अंतर पूर्ण करणार आहे. मुंबई व पुणे या दोन महानगरांना हायपरलूप तंत्रज्ञानाद्वारे जोडणारा हा अत्याधुनिक वाहतूक प्रकल्प आहे. कुर्ला बीकेसी ते वाकडदरम्यान ११७.५० किमी अंतरावर हा प्रकल्प कार्यान्वयीत होणार आहे. जवळपास ७० हजार कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक यामध्ये होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अशी गुंतवणूक होणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प असणार आहे. सोबतच अतिवेगवान प्रवास साध्य करणारा हा जगातील पहिलाच हायपरलूप प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात जवळपास पाच हजार कोटी रुपये खर्च होणार असून या टप्प्यात ११.८० किमी लांबीचा पथदर्शी प्रकल्प बांधण्यात येणार आहेत. यासाठी दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागेल. तर संपूर्ण प्रकल्पासाठी सहा ते सात वर्षांचा कालावधी लागणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती