जम्मू-काश्मीर: पूंछमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनांवर अतिरेकी हल्ला, चार जवानांचा मृत्यू

शुक्रवार, 22 डिसेंबर 2023 (21:44 IST)
गुरुवारी, जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात लष्कराच्या दोन वाहनांवर अतिरेकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात लष्कराचे चार जवानांचा मृत्यू झाला आहे.
अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सुरनकोट पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या डेरा की गली आणि बुफलियाज दरम्यानच्या एका वळणावर 4 वाजून 45 मिनिटांनी हा हल्ला झाला.
 
सुरनकोटजवळ झालेल्या या हल्ल्यात चार जवानांचा मृत्यू झाल्याचे लष्कराने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
 
अधिकार्‍यांनी सांगितलं की, 'दोन जवानांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले आहेत.'
 
राज्याचे तीन माजी मुख्यमंत्री, मेहबुबा मुफ्ती, गुलाम नबी आझाद आणि फारुख अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.
 
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाची शाखा पीपल्स अँटी फासिस्ट फ्रंट (पीएएफएफ) या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
 
जम्मू स्थित डिफेन्स पीआरओ लेफ्टनंट कर्नल सुनील बर्थवाल यांनी सांगितलं की, "दहशतवादी ज्या ठिकाणी उपस्थित होते, त्या ठिकाणची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे, बुधवारी रात्री पूंछच्या थानामंडी-सुरनकोट भागात संयुक्त शोध मोहीम राबविण्यात आली."
 
लष्कराने म्हटल्याप्रमाणे, "सैनिकांच्या एका ट्रक आणि जिप्सीवर हल्ला करण्यात आल्यावर सैनिकांनी तत्काळ त्याला प्रत्युत्तर दिलं."
 
लष्कराच्या वाहनांवर झालेला हल्ला
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ऑपरेशन सुरू असून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
 
पूंछ आणि राजौरी दरम्यान वनक्षेत्र आहे आणि या ठिकाणाला 'डेरा की गली' असं म्हणतात.
 
ऑक्टोबर 2021 नंतर घडलेली ही चौथी घटना आहे.
 
लष्कराने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे 20 डिसेंबरच्या रात्रीपासून डेरा की गली भागात शोध मोहीम सुरू होती.
लष्कराचे म्हणणं आहे की, या मार्गावरून जिप्सी आणि ट्रक जात होते, ज्यामध्ये लष्कराचे सैनिक होते. डोंगराळ भागात लपलेल्या अतिरेक्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.
 
सर्वात आधी त्यांनी वाहनांचे टायर पंक्चर केले, नंतर ग्रेनेड फेकले आणि गोळीबार सुरू केला.
 
लष्कराच्या ताफ्यावर अचानक हल्ला करून अतिरेकी गायब झाले. ते कुठे गेले, हे कोणालाच कळलं नाही. सध्या या भागात अतिरेक्यांचा शोध सुरू आहे.
 
घटनास्थळावरून समोर आलेले फोटो आणि व्हिडिओ अस्वस्थ करणारे आहेत. रस्त्यावर सांडलेलं रक्त, सैनिकांचे तुटलेले हेल्मेट अशा गोष्टी छायाचित्रांमध्ये दिसत आहे. तसेच लष्कराच्या दोन वाहनांच्या काचा फुटल्या असून त्याचे तुकडे रस्त्यावर पडलेले दिसतात.
 
लोकवस्तीपासून लांब असलेलं ठिकाण
या भागापासून किमान पाच ते सहा किलोमीटर अंतरावर लोकवस्ती आहे.
 
अतिरेक्यांनी जाणीवपूर्वक या भागाची निवड केल्याचं दिसतं. या मार्गावरून लष्कराची वाहने ये-जा करत असतात हे त्यांना माहीत होतं.
 
आणखी एक गोष्ट म्हणजे इथला रस्ताही थोडा खराब आहे, त्यामुळे एखादं मोठं वाहन जाताना त्याचा वेग कमी होतो.
 
अशा स्थितीत अतिरेक्यांना हल्ला करणं सोपं जातं आणि जवळपास लोकवस्ती नसल्याने मागून मदत येईपर्यंत त्यांना पळून जाण्याची संधी मिळते.
 
जम्मूमध्ये वाढणारे अतिरेकी हल्ले
 
यापूर्वीही झालेल्या हल्ल्यानंतर अतिरेकी गायब व्हायचे. याचा शोध घेण्यासाठी लष्कराने तीन आठवडे येथे शोधमोहीम राबवली होती.
 
स्थानिक पातळीवर अतिरेक्यांना पाठिंबा मिळतोय की बंदुकीच्या जोरावर लोकांकडून जीवनावश्यक वस्तू घेण्याचे प्रकार सुरू आहेत याविषयी आता प्रश्न उपस्थित होऊ लागलेत.
 
यापूर्वी काही अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, हे अतिरेकी छोट्या छोट्या गटाने काम करतात.
 
उत्तर कमांडचे लेफ्टनंट जनरल उपेंद्र दीक्षित म्हणाले की, हा परिसर शोधून काढण्यासाठी त्यांना एक वर्षाचा कालावधी लागू शकतो.
 
गेल्या महिन्यातच राजौरीजवळील बाजीमल वनक्षेत्रातील धरमसाल पट्ट्यात सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झाली होती ज्यात लष्कराचे पाच जवान शहीद झाले होते.
 
पूर्वी, लष्कराच्या तळांवर हल्ले केले जायचे. उदाहरण म्हणून आपण उरी किंवा श्रीनगरवरील हल्ला पाहू शकतो. पण आता पॅटर्न बदलला आहे, ऑक्टोबर 2021 पासून रस्त्यावरच हल्ले होत आहेत.
 
दरम्यानच्या काळात काश्मीरमध्ये मोठा हल्ला झाला नसला तरी राजौरी आणि पूंछमध्ये हल्ले वाढले असल्याचेही तुम्हाला दिसेल.
 
याचं एक कारण म्हणजे या भागात तुलनेने शांतता होती. त्यामुळे हा भाग अतिरेकी मुक्त असल्याचा दावा सरकारने केला होता. पण आता एकप्रकारे अतिरेकी सरकारलाही आव्हान देत आहेत.
 
या वर्षात लष्कराचे 19 जवान शहीद
गेल्या महिन्यातही राजौरीजवळ लष्कराचे पाच जवान शहीद झाले होते. दोन दिवस चाललेल्या लष्करी कारवाईत लष्कर-ए-तैयबाचा कमांडर आणि त्याचा एक साथीदार मारला गेला.
 
मे महिन्यात राजौरी येथील लष्कराच्या कारवाईत पाच जवान शहीद झाले होते, तर एक अधिकारी जखमी झाले होते. या कारवाईत एक विदेशी अतिरेकीही मारला गेला.
 
या वर्षी राजौरी, पूंछ आणि रियासी जिल्ह्यात अनेक अतिरेकी हल्ले झाले. यात लष्कराचे 19 जवान शहीद झाले. (एप्रिल 20, 5 जवान शहीद; मे 5, 5 जवान शहीद; 22 नोव्हेंबर, 5 जवान शहीद; 21 डिसेंबरला 4 जवान शहीद)
 
अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, "या भागात दहशतवादाला पुन्हा प्रोत्साहन देण्यासाठी सीमेपलीकडून प्रयत्न केले जात आहेत."
 
या हल्ल्यांवर काश्मीरी नेत्यांची प्रतिक्रिया काय?
डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी (डीपीएपी) चे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी गुरूवारच्या हल्ल्याचा निषेध केला असून एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलंय की, ते "विनाशकारी आहे." मृतांच्या संख्येमुळे आम्ही खूप दुःखी आहोत.
 
त्यांनी लिहिलंय की, "जम्मूमध्ये दहशतवादाच्या वाढत्या कारवाया धक्कादायक आहेत. सरकारने यावर तात्काळ निर्णय घ्यावा असं मी त्यांना आवाहन करतो. मी जखमींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतो."
 
पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनीही ही घटना 'भयंकर' असल्याचं म्हटलं आहे.
 
त्यांनी या "भ्याड हल्ल्याचा" निषेध केला असून शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांबद्दल आणि प्रियजनांप्रती तीव्र शोक व्यक्त केला.
 
अपनी पार्टीचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मंत्री अल्ताफ बुखारी यांनी सैनिकांच्या मृत्यूबद्दल ऐकून दुःख झाल्याचं म्हटलं आहे.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती