धक्कादायक, दीड वर्षापासून पत्नीला शौचालयात कोंडून ठेवलं

गुरूवार, 15 ऑक्टोबर 2020 (13:54 IST)
हरयाणाच्या पानिपत जिल्ह्यात एका धक्कादायक प्रकरणात एका ३५ वर्षीय महिलेची सुटका करण्यात आली आहे. या महिलेला तिच्या पतीने तब्बल दीड वर्षांपासून शौचालयात कोंडून ठेवले होते. 
 
पानिपत जिल्ह्यातील रीशपूर गावामध्ये ही घटना असून सुटका केल्यावर तिला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर चुलतभावाकडे या महिलेला सोपवण्यात आले. सुटका केली तेव्हा तिची अत्यंत वाईट अवस्था होती. महिलेला तीन मुलं आहेत.
 
पतीने महिलेला बंधक बनवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर, जिल्हा महिला संरक्षण अधिकारी रजनी गुप्ता पोलीस अधिकाऱ्यांच्या टीमसह घटनास्थळी दाखल झाल्या आणि एका अत्यंत छोटयाशा शौचालयातून या महिलेची सुटका केली.
 
मागील दीडवर्षांपासून महिलेला अशाच पद्धतीची अमानवीय वागणूक मिळत असल्याचे समोर आले. शौचालयाचा दरवाजा उघडला तेव्हा महिला तिथे खाली निपचित पडलेली होती. चार पावले टाकणं कठिण जातं होते ती इतकी अशक्त झाली होती की. बंधक बनवून तिला व्यवस्थित वागणूक तसेच अन्न-पाणी दिले जात नसल्याचे समोर आले. 
 
महिलेच्या लग्नाला १७ वर्ष झाली असून तिला एक मुलगी आणि दोन मुलगे आहेत. पीडित महिलेच्या पतीने तिला मानसिक आजार असल्याचे सांगितले. महिलेच्या पती विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती