गुजरातमध्ये दलित तरुणाने पगार मागितला म्हणून मारहाण करुन चप्पल चाटायला लावली

शनिवार, 25 नोव्हेंबर 2023 (17:29 IST)
गुजरातमधल्या मोरबीमध्ये एका दलित तरुणानं पगार मागितल्याच्या रागातून त्याला जनावराप्रमाणं मारहाण करण्यात आली आहे. तसंच त्याला चप्पल चाटायला लावण्यात आल्याचा आरोप करत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
नीलेश दलसानिया नावाच्या 21 वर्षीय दलित तरुणाला प्रचंड मारहाण करून अपमानास्पद वागणूक दिल्या प्रकरणी मोरबीच्या ए डिव्हिजन पोलीस ठाण्यात सिरॅमिक फॅक्टरीच्या मालक विभूती पटेल उर्फ रानिबा आणि इतर पाच जणांच्या विरोधात अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
नीलेशला जनावरांप्रमाणं मारहाण केल्यानं त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करावं लागलं. थकीत पगार न दिल्याचं प्रकरण वाढत गेल्यानं ही घटना घडल्याचं समोर आलं.
 
विभूती पटेल या मोरबीमधील रावपर जवळच्या एका सिरॅमिक फॅक्टरीच्या मालक आहेत. या फॅक्टरीतून टाइल्सचा बहुतांश माल निर्यात होतो. तक्रारीतील माहितीनुसार ही घटना गेल्या बुधवारी रात्री सुमारे 8.30 वाजता कॅपिटल मार्केट नावाच्या शॉपिंग सेंटरमध्ये घडली.
 
प्राथमिक माहितीनुसार, नीलेश यांनी गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात कारखान्यात सेल्स मॅनेजर म्हणून काम सुरू केलं होतं. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडली. थकलेला पगार मागितल्यामुळं त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
या कथित मारहाणीनंतर जेव्हा तक्रारकर्ता उपचारासाठी रुग्णालयात पोहोचला तेव्हा पोलिसांनी विभूती पटेल, ओम पटेल, राज पटेल, परीक्षित यांना अटक केली. रबारी आणि आणखी एका अज्ञाताविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेनंतर पीडित तरुणाला रुग्णालयात नेण्यात आलं. एका फोटोत त्यांच्या खांद्यावर आणि पाठीवर लाल व्रण दिसत आहेत.
 
बीबीसी गुजरातीनं या संपूर्ण प्रकरणाची तपशीलवार माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
 
थकीत पगार मागितल्याने मारहाण
माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत रुग्णालयाच्या बेडवरून पीडित नीलेशनं संपूर्ण घटनेबाबत माहिती दिली. रानिबा एक्सपोर्टच्या ऑफिसमध्ये 20 दिवस काम केल्यानंतर दुसऱ्या व्यवसायासाठी ते काम सोडल्यानं नीलेश म्हणाले.
 
"यानंतर मी त्या 20 दिवसांचा पगार मागण्यासाठी संपर्क केला. आधी तर त्यांनी मला पगार द्यायला नकार दिला. काही बोलाबोली नंतर विभूती पटेलच्या भावानं मला फोन केला आणि संध्याकाळी भेटायला बोलावलं," असंही ते म्हणाले.
 
नीलेशच्या मते, फोनवर बोलल्यानंतर तो भाऊ आणि एका मित्राबरोबर फॅक्टरीमध्ये निघून गेला. त्याठिकाणी पोहोचल्यानंतर कारखान्याबाहेर उभं राहून त्यानं हाक मारल्यावर अचानक 30-35 लोकांनी त्याला घेरलं.
 
तक्रारीनुसार, "त्या लोकांनी अचानक आमच्यावर हल्ला केला. माझ्याबरोबरचे दोन जण पळून गेले आणि मी पडलो. त्याठिकाणी मला खूप मारहाण करून उचलून नेले."
 
जातीवाचक शब्दांचा वापर
नीलेशनं घटनेबाबत सांगताना पुढं म्हटलं की, "मला उचलून नेल्यानंतर बेल्ट आणि हातात जे काही येईल त्यानं मला मारहाण सुरू करण्यात आली. थोड्या वेळानं तिथं विभूती पटेल आल्या आणि मला थप्पड मारत तुला कशाचे पैसे पाहिजे असं म्हटलं, तसंच मला माफी मागण्यास सांगू लागल्या."
 
नीलेश दलसानिया यांनी तक्रारीत पुढं म्हटलं की, यानंतर 'रानिबा' यांनी त्यांच्याबाबत जातीवाचक शब्द वापरले आणि त्याच्या तोंडात चप्पल घातली.
 
यानंतर त्यांनी मला घाबरवलं तसंच सहकाऱ्यांबरोबर खंडणी मागितल्याचं म्हणत रात्री उशिरा विभूती पटेल यांची माफी मागितल्याचा व्हीडिओ तयार केला, असंही नीलेश म्हणाले.
 
तक्रारीनुसार, हा कथित व्हीडिओ तयार केल्यानंतर नीलेश यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. तसंच मारहाण करून हाकलून दिले. तिथून नीलेश रुग्णालयात गेले आणि उपचारानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली.
 
बीबीसी गुजरातीनं या आरोपांवर प्रतिक्रिया मिळवण्यासाठी आरोपींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्या सर्वांचे फोन बंद येत होते.
 
मोरबीचे डीवायएसपी पी.ए.झाला यांनी याबाबत बीबीसी गुजरातील माहिती देताना, या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून, आरोपींची चौकशी सुरू असल्याची माहिती दिली.
 
तसंच आरोपींचा शोध लागला नसल्यानं या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलं नसल्याचं त्यांनी सांगितलं.
 
आयपीसीच्या कलम 323, 504, 506 (2) तसंच दंगल आणि अत्याचार अधिनियमाच्या इतर कलमांतर्गतही तक्रार दाखल करण्यात आली आहे, असंही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
 
याबाबत सविस्तर माहिती देताना त्यांनी सांगितलं की, "आरोपींनी 500 रुपये आणि स्मार्टवॉचही लूटल्याचंही तक्रारदारानी सांगितलं आहे. त्यामुळं तक्रारीनंतर दरोड्याची कलमं जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
 
आरोपींना पकडण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. तक्रारदाराच्या भावाबरोबर घर आणि कार्यालयाची झडती घेण्यात आली. त्याठिकाणी आरोपी आढळले नाहीत. आरोपींना शोधण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत. त्यापैकी एक एससी-एसटी सेल, दूसरे सिटी ए डिवीजन पीआय आणि एक टीम डी-स्टाफ पीएसआयचे आहे. सोबतच एलसीबी टीम द्वारेही निगराणी केली जात आहे. "
 
तक्रारदाराच्या कथित व्हीडिओबाबत बोलताना डीवायएसपी झाला म्हणाले की, "आरोपींना अटक केल्यानंतर त्यांचा मोबाईल फोन जप्त केला जाईल. त्यानंतर पुढची चौकशी होईल. त्याशिवाय कट कारस्थानाचा पुरावा असल्यास तशी कलमं लावली जातील."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती