एल्गार परिषद प्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन करणार

सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (16:31 IST)
कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन करणार आहेत. मुंबईत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन गृहमंत्री अनिल देशमुख कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करतील, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.
 
शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांशी चर्चा केली. एसआयटी स्थापन करण्याबाबत शरद पवारांनी राज्य सरकारला पत्र दिलं होतं. राज्य सरकार एल्गार परिषदेसंदर्भात समांतर एसआयटी स्थापन करु शकते, एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) च्या कलम 10 नुसार वेगळी समिती स्थापन करण्याची तरतूद आहे, असं मलिक यांनी स्पष्ट केलं.
 
महाविकास आघाडीमध्ये कोणताही विसंवाद नसल्याचा पुनरुच्चारही यावेळी मलिक यांनी केला. भाजपला सरकारमध्ये राहण्याचा रोग झाला आहे, त्यामुळे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये विसंवाद असल्याचा अपप्रचार केला जात असल्याचा दावाही नवाब मलिक यांनी केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती