सर्वेक्षण अहवाल सांगतो, इमारतींपेक्षा झोपडपट्टी परिसरात ॲन्टीबॉडीजचे प्रमाण अधिक

शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020 (12:01 IST)
मुंबईमध्ये ‘सार्स-कोव्हिड-2’ संदर्भात ॲन्टीबॉडीज सर्वेक्षणाच्या दुसऱ्या फेरीचा अहवाल आला आहे . या अहवालानुसार इमारतींपेक्षा झोपडपट्टी परिसरात ॲन्टीबॉडीजचे प्रमाण अधिक असल्याचं आढळून आलं आहे 
 
मुंबईमध्ये ‘सार्स-कोव्हिड-2’ संसर्गाच्या अनुषंगाने, रक्त नमुने घेऊन करावयाचे सर्वेक्षण अर्थात सेरोलॉजिकल सर्वेलन्साचा उपक्रम नीती आयोग, बृहन्मुंबई महानगरपालिका, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई) यांच्याद्वारे संयुक्तरित्या राबविण्यात येत आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अभ्यास करताना कस्तुरबा रेणूजीवशास्त्र वैद्यकीय प्रयोगशाळा, ट्रांसलेशनल स्वास्थ्य विज्ञान एवं प्रौद्योगिकी संस्थान  ए.टी.ई. चंद्रा फाऊंडेशन आणि आय.डी.एफ.सी. इन्स्टिट्यूट हे देखील त्यामध्ये सहयोगी संस्था म्हणून सहभागी आहेत.
 
भारतातील एक व्यापक अवछेदी सर्वेक्षण (क्रॉस-सेक्शनल सर्वे) म्हणून या अभ्यासाचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये असलेल्या रक्तातील प्रतिद्रव्या्चे (ॲन्टी्बॉडीज) प्राबल्य जाणून घेणे हे होते. त्यासाठी नमूना निवड पध्दतीनुसार नमुने संकलित करण्यात आले. झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसर मिळून आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर या 3 विभागांमध्ये सर्वसाधारण लोकसंख्येतून हे नमुने संकलित करण्यात आले होते.  यामध्ये अबॉट कंपनीच्या क्लिया पद्धतीचा उपयोग करून अँटी सार्सकोव्हिड आयजीजी ॲण्टीबॉडीची पडताळणी करण्यात आली 
 
संबंधित सर्वेक्षणाच्या दुसऱ्या फेरी अंतर्गत आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर याच तीन विभागात सदर सर्वे सप्टेंबर अखेरीस करण्यात आला. या दुसऱ्या फेरी अंतर्गत 5 हजार 840 एवढ्या लक्ष्य नमुन्यांपैकी 5 हजार 384 नमूने संकलित करण्यात आले. हे नमूने संकलित करण्यासाठी 728 व्यक्ती कार्यरत होते.
 
सर्वेक्षणाच्या दुसऱ्या फेरीदरम्यान आढळून आलेली महत्वाची निरीक्षणे
 
पहिल्या फेरीतील सर्वेक्षणादरम्यान संबंधित तीन विभागांमध्ये केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासातून असे निदर्शनास आले होते की, झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे 57 टक्के आणि बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे 16 टक्के याप्रमाणे या रक्तातील प्रतिद्रव्याचे प्राबल्य आढळून आले आहे.
 
दुसऱ्या फेरीतील सर्वेक्षणादरम्यान संबंधित तीन विभागांमध्ये केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासातून असे निदर्शनास आले आहे की, झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे 45 टक्के आणि बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे 18 टक्के याप्रमाणे रक्तातील प्रतिद्रव्याचे प्राबल्य आढळून आले आहे.
 
सर्वेक्षणाच्या दोन्ही फेऱ्यांमध्ये ॲन्टीबॉडीज प्राबल्य हे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये किंचितसे अधिक आढळून आले आहे. मात्र, पहिल्या फेरी दरम्यान तीनही विभागांतील लोकसंख्येमध्ये सर्व वयोगटांमध्ये समान प्राबल्य असल्याचे आढळले होते. तर दुसऱ्या फेरी दरम्यान हे प्राबल्य 40 पेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींमध्ये काही प्रमाणात अधिक असल्याचे आढळून आले आहे.
 
सर्वेक्षणाच्या दोन्ही फेऱ्यांदरम्यान आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये सरासरी 27 टक्के एवढे ॲन्टीबॉडीज प्राबल्य आढळून आले आहे. या अंतर्गत हेल्थ पोस्ट, दवाखाने, आरोग्य कार्यालय आणि क्षेत्रस्तरावर काम करणारे कर्मचारी यांचा समावेश आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती